मराठी भाषा ही आमची आन-बान-शान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:06 AM2021-03-04T05:06:06+5:302021-03-04T05:06:06+5:30
०२ लोक ०६ के (फोटो) तुमसर : छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. अमृतातेही पैजा जिंकणारी ...
०२ लोक ०६ के
(फोटो)
तुमसर : छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. अमृतातेही पैजा जिंकणारी मराठी भाषा हा अभिमान मिळविण्यासाठी ‘मी मराठी, माझी मराठी!’ असा बाणा जपायला हवा. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांनी आपल्या लेखणीतून समाजजागृती केली. त्यासाठी मराठीत विचार करण्याची, मराठीत बोलण्याची आणि व्यक्त होण्याची गरज आहे. दैनंदिन व्यवहार हा मराठी भाषेतच व्हायला हवा. मराठी भाषा आमची आन-बान-शान आहे, असे प्रतिपादन पत्रकार राहुल डोंगरे यांनी केले. ते मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित बस स्थानक तुमसर येथे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहाय्यक कार्यशाळा अधीक्षक किरण चोपकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून लेखाकार प्रमोद बारई, वाहतूक निरीक्षक रचना मस्करे हे उपस्थित होते.
राहुल डोंगरे म्हणाले, मराठीतील लेखन-वाचनाच्या नवनव्या प्रयोगांचा स्वीकार करायला हवा, मुलांमध्ये, तरुण पिढीमध्ये मराठीची ओढ वाढावी, तिची गोडी लागावी यासाठी कलाविष्कार, मनोरंजन क्षेत्राच्या माध्यमातून होणाऱ्या प्रयत्नांचे स्वागत करायला हवे. नवे तंत्रज्ञान, नव्या माध्यमात, समाज माध्यमांतही मराठीचा आवर्जून वापर व्हायला हवा. आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण देण्याऐवजी मराठी माध्यमाच्या शाळेतूनच शिक्षण द्यावे तरच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज व संत रोहिदास यांना खऱ्या अर्थाने अभिवादन केल्याचा मनस्वी आनंद होईल, असे प्रांजळ मत या वेळी व्यक्त केले.
साहाय्यक कार्यशाळा अधीक्षक किरण चोपकर, लेखाकार प्रमोद बारई यांनीही विचार व्यक्त केले. या वेळी कपिल लांबट,रवींद्र धुर्वे, मनोज रोडगे, श्रीमती ऊके, चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी, प्रवासी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाहतूक निरीक्षक रचना मस्करे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार लिपिक रविता आडे यांनी मानले.