अखेर मिलर्सनी भरडाईसाठी धानाची केली उचल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:49 AM2021-02-26T04:49:39+5:302021-02-26T04:49:39+5:30
नोव्हेंबर महिन्यापासून २३ लाख क्विंटल धानाची खरेदी झाली होती. मिलर्सनी आपल्या मागण्यांसाठी भरडाईसाठी धान न उचलण्याचा निर्णय घेतला ...
नोव्हेंबर महिन्यापासून २३ लाख क्विंटल धानाची खरेदी झाली होती. मिलर्सनी आपल्या मागण्यांसाठी भरडाईसाठी धान न उचलण्याचा निर्णय घेतला होता. संपूर्ण गोदाम हाऊसफुल्ल झाले होते. भरडाईसाठी धान जात नसल्याने धान खरेदीचा प्रश्न निर्माण झाला होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी सुमारे २ महिन्यांपर्यंत वरिष्ठ पातळीवर बैठका घेण्यात आल्या. परंतु अपेक्षित तोडगा निघत नव्हता. त्यामुळे धान खरेदी प्रभावित होऊन शेतकऱ्यांना फटका बसत होता. अनेक धान खरेदी केंद्रावर उघड्यावर धान ठेवण्यात आला होता. अवकाळी पावसाचा फटकाही या धानाला बसला होता. वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊनही मिलर्सचे समाधान होत नव्हते. अखेर राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. शासन आणि मिलर्स यांच्यात योग्य शिष्टाई करून भरडाईचा प्रश्न तात्पुरता निकाली काढला. ३१ मार्चपर्यंत मिलर्सच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले. तोपर्यंत तुम्ही भरडाई करा असे खासदार पटेल यांनी मिलर्सला सांगितले. मिलर्स संघटनेने खासदार पटेल यांच्या शब्दाला मान देत बुधवारपासून भरडाईला प्रारंभ केला. यामुळे जिल्ह्यातील धान भरडाईचा तिढा संपला. आता धानाची उचल होऊन गोदाम खाली होतील आणि खरेदी वेगाने होईल.
या आहेत मिलर्सच्या मागण्या
सीएमआर अंतर्गत केंद्र सरकारच्या अखत्यारीतील खरेदी केंद्रावरील धान उचलून मिलर्सच्या माध्यमातून भरडाई केली जाते. यात केंद्र सरकार भरडाईसाठी ३० रुपये व राज्य सरकार १० रुपये असे ४० रुपये प्रतिक्विंटल मिलर्सना दिले जातात. १०० किलो धानाचा उतारा ६७ किलो तांदूळ बंधनकारक असतो. यात काही टक्के खंडा अर्थात तुकडा तांदूळ समाविष्ट असतो. अशी ही गतवर्षीपर्यंत चालत आलेली पद्धत होती. परंतु मिलर्सचे गत तीन वर्षांपासून भरडाईचे पैसे थकीत होते. काही जाचक अटीही लादल्या होत्या. तसेच भरडाईच्या दरवाढीचीही मागणी होती. यासाठी शासनस्तरावर अनेकदा चर्चाही झाल्यात.
तात्पुरत्या स्वरूपात का होईना काही मिलर्सनी धानाची उचल केली आहे. संपूर्ण जिल्ह्यात सुमारे ९५ टक्के धान खरेदी आटोपली आहे. भरडाईकरिता धान मिलर्सनी उचल केल्याने बाहेर मोजलेल्या धानाला प्रथम प्राधान्य देण्यात येईल. शेतकऱ्यांनी आपल्याकडील धान केंद्रावरच विकावा.
-गणेश खर्चे,
जिल्हा पणन अधिकारी, भंडारा.