मोहाडी तालुक्यातील सतरा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. उमेदवारांना निवडणूक चिन्ह मिळाले आहेत. या निवडणुकीत ३४९ उमेदवार १४१ जागांसाठी नशीब अजमावणार आहेत. प्रचाराची धामधूम सुरू झाली आहे. या निवडणुकीत ४४ उमेदवारांनी ‘कपबशी’ या चिन्हावर अधिक पसंती दर्शविली आहे. त्यानंतर ४३ उमेदवारांनी ‘टोपली’ हा आवडते चिन्ह घेतले आहे. त्या खालोखाल गॅस सिलिंडर ३६ उमेदवारांनी, ३२ उमेदवारांनी ‘जग’ या चिन्हाला पसंत केले आहे. रोडरोलर, पेटी , बस, छत्री, छताचा पंखा, असे वीस ते तीसच्या आत उमेदवारांनी निवडणूक चिन्ह घेतले आहे. त्यानंतर बॅट, शिवणयंत्र, ट्रॅक्टर, नगारा, कपाट, ऑटोरिक्षा, पाटी या चिन्ह दहा-एकोणवीस या संख्येत चिन्ह निवडले आहेत तर पाटी, कात्री, टेबल, दूरदर्शन संच, खटारा, फुटबॉल, नांगर ही निवडणूक चिन्ह एक-चार उमेदवारांना दिली गेली आहेत.
उमेदवारांना चिन्ह मिळाल्यानंतर बिल्ले, पत्रक, फलक, तातडीने छापायला दिले गेले आहेत. गावात उमेदवारांचे फोटो व चिन्हासह लावलेले फलक दिसू लागले आहेत. निवडणूक रंगात आली असून निवडून येण्यासाठी विविध आयुधांचा वापर केला जात आहे.
बॉक्स
चार रंगाचे बॅलेट पेपर
ईव्हीएम मशीनवर चार रंगाचे बॅलेट पेपर दिसणार आहेत. अनुसूचित जातीप्रवर्गासाठी फिक्कट गुलाबी, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी फिक्कट हिरवा, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी फिक्कट पिवळा तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी पांढरा रंगाचे असे चार ईव्हीएम मशीनवर बॅलेट पेपर दिसून येणार आहेत. या चारही रंगाच्या शिकवणी पत्रिका उमेदवारांनी छापून घेतल्या आहेत.