भंडारा जिल्ह्यातील दोन वाघांच्या मृत्यूचे गूढ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 03:13 PM2019-01-24T15:13:14+5:302019-01-24T15:16:56+5:30
उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील दोन वाघांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात वन्यजीव विभागाला अद्यापही यश आले नाही.
ज्ञानेश्वर मुंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील दोन वाघांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात वन्यजीव विभागाला अद्यापही यश आले नाही. फॉरेन्सिक रिपोर्टमधून काहीही हाती लागलेले नसल्याने आता वाघांच्या अवयवाचे नमुने (व्हिसेरा) उत्तरप्रदेशातील इज्जतपूरच्या भारतीय पशुचिकित्सा अनुसंधान संस्थेकडे पाठविण्यात आले आहे. अद्यापपर्यंत या प्रकरणात वन्यजीव विभाग कोणत्याच ठोस निर्णयापर्यंत पोहोचले नसून आरोपींचाही थांगपत्ता नाही.
सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात उमरेड-पवनी- कऱ्हांडला अभयारण्याच्या पवनी गेट कक्ष क्रमांक २२६ मध्ये दोन वाघांचा मृत्यू झाला होता. ३० डिसेंबर रोजी टी-१ अर्थात चार्जर आणि दुसऱ्या दिवशी ३१ डिसेंबरला टी-४ अर्थात राही वाघीणीचा मृतदेह आढळला होता. या घटनेने संपूर्ण पेंच वन्यजीव विभाग हादरुन गेला होता. या वाघांच्या मृत्यूच्या कारणाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. शवविच्छेदनानंतर तीन नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले. दुसरीकडे वन्यजीव विभागाने श्वान पथकाच्या मदतीने जंगल पालथे घातले. सुरुवातीला या वाघांवर विषप्रयोग झाल्याचे पुढे आले. शिकारीसाठी टाकलेले विषयुक्त गोळे रानडुकरांनी खाल्ले. त्यातून मृत्यूमुखी पडलेल्या रानडुकरांचे मांस या दोन वाघानी खाल्याने त्यांचा मृत्यू झालाचा प्राथमिक अंदाज काढण्यात आला. परिसरातील नागरिकांची चौकशी करण्यात आली. माहिती देणाºयास बक्षीस घोषित करण्यात आले. परंतु वन्यजीव विभागाच्या हाती काहीच लागले नाही.
दरम्यान फॉरेन्सिक विभागाचा अहवाल प्राप्त झाला. मात्र यातून काहीच निष्पन्न होत नसल्याने तपास थंडावला आहे. आता उत्तरप्रदेशातील इज्जतपूरच्या भारतीय पशुचिकित्सा अनुसंधान संस्थेत या वाघाच्या अवयवाचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. त्याठिकाणी ‘इस्टोपॅथॉलॉजी’ आणि ‘टॉक्झीकोलॉजी’ या तपासण्या होऊन त्यात या वाघांच्या मृत्यूचे खरे कारण पुढे येईल, अशी अपेक्षा आहे. मात्र सध्यातरी या वाघांच्या मृत्यूचे गूढ वन्यजीव विभागाला उकलण्यात अपयश आले, असेच म्हणावे लागेल.
अभयारण्याची सुरक्षा वाऱ्यावर
वाघांचे वास्तव्य असलेल्या अभयारण्यात सुरक्षेच्या व्यापक उपाययोजना करणे आवश्यक असते. मात्र उमरेड- पवनी- कऱ्हांडला अभयारण्यात अशा कोणत्याही खास उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे दिसून येते. दोन वाघांच्या मृत्यूने वन्यजीव विभागाची मोठी हानी झाली. आता अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढले जात आहे. या अभयारण्यात कर्मचाºयांची साधी गस्तही नसल्याचे या दोन वाघांच्या मृत्यूनंतर पुढे आले.
उमरेड-पवनी-कºहांडला अभयारण्यातील दोन वाघांचा मृत्यूचा तपास युध्दस्तरावर सुरु आहे. वाघांच्या अवयवाचे नमुने उत्तरप्रदेशात पाठविण्यात आले आहे. तसेच अभयारण्याशेजारी गावातील संशयीतांची चौकशी केली जात आहे. या वाघांच्या मृत्यूचे कारण लवकरच स्पष्ट होईल आणि आरोपी जेरबंद होतील.
- राहूल गवई,
विभागीय वनअधिकारी, पेंच वाघ्र प्रकल्प