तुमसर: स्थानिक पोलीस ठाण्यात नियुक्त केलेले डीबी पथक केवळ नावालाच असल्याचे समोर आले आहे. गत काही महिन्यांत चोरी व घरफोडी, खुनाचा घटनांमध्ये वाढ झालेली असताना, अजूनपर्यंत एकाही प्रकरणाचा तपास लावण्यात डीबी पथकाला यश तर आलेच नाही. उलट शहरात अवैध धंदे खूप मोठ्या प्रमाणात राजरोसपणे सुरू आहेत. त्यामुळे तुमसर पोलीस ठाण्यात डीबी पथक आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होतोय.
चोरी, घरफोडी, लुटमार, चेन चोरी, खून आदी घटनांचा तत्काळ तपास लागावा, यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एका डीबी पथकाची नियुक्ती केलेली आहे. यासाठी सहायक पोलीस अधिकाऱ्यासह पाच ते सहा कर्मचाऱ्यांचा समावेश राहते. मात्र, मागील काही महिन्यांपासून या पथकांची कामगिरी फारशी उल्लेखनीय नसल्याचे दिसून येत आहे. वारंवार एवढ्या घटना घडूनही डीबी पथक शांतच आहेत. उलट हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशनसमोरच ऐन बाजार परिसरात सट्टा आणि जुगाराच्या टपऱ्या उघडल्या आहेत, तर शहरातील विविध चौकांत मोहफुलाची गावठी दारू विक्रीची दुकाने नव्हे, तर गावठी दारूचे बार राजरोसपणे सुरू आहेत, जुगाराचे अड्डे शहरात सुरू आहेत. तुमसरसारख्या छोट्याशा शहरात प्रोटेक्शन मनीच्या नावावर हप्तावसुली केली जात असताना, तुमसरचे डीबी पथक मूक दर्शक बनून घटनेची वाट पाहत राहतात. परिणामी, या धोरणामुळे युवावर्ग आपसूकच या व्यवसायात ओढले जात असून, दरदिवशी छोट्या-मोठ्या चोरीचे प्रमाण अधिक वाढले आहेत. शहरात रात्रीची गस्त वाढविणे गरजेचे असताना, गस्तीच्या नावाखाली शहराच्या मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत पोलीस एकाच ठिकाणी थांबत असल्याचे बोलले जात आहे.