जिल्ह्यातील एमआयडीसी नावापुरतीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:46 AM2021-06-16T04:46:41+5:302021-06-16T04:46:41+5:30
जिल्ह्यात बोटांवर मोजण्याइतपत उद्योग : जिल्ह्यात बेरोजगारांची मोठी फौज भंडारा : पूर्व विदर्भात येणारा भंडारा जिल्हा उद्योगाच्याबाबतीत प्रचंड ...
जिल्ह्यात बोटांवर मोजण्याइतपत उद्योग : जिल्ह्यात बेरोजगारांची मोठी फौज
भंडारा : पूर्व विदर्भात येणारा भंडारा जिल्हा उद्योगाच्याबाबतीत प्रचंड मागासलेला आहे. येथे एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) क्षेत्र असले तरी ते फक्त नावापुरतेच आहे. काही तालुक्यात तर एमआयडीसीचे फलक फक्त उभे आहेत. ना तिथे शेतजमीन राहिली, ना उद्योग आले. या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेकडो बेरोजगार तरुण आजही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत.
विद्यमान आकडेवारीवर नजर घातल्यास भंडारा जिल्ह्यात नोंदणीकृत कंपन्यांची संख्या १३३ आहे. या कंपनीतून जवळपास ९ हजार ४९८ कामगार आहेत. विद्यमान स्थितीत १०४ कंपन्या नियमितपणे सुरू असून, त्यामधून ७ हजार ३४९ कामगार कार्य करीत आहेत. तिथेही वेतन व सोयी-सुविधाचा अभाव आदी कारणे प्रमुख समस्या म्हणून समोर येत आहेत.
विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा, साकोली, पवनी, लाखांदूर क्षेत्रात एमआयडीसीची मोठी जागा आहे. या ठिकाणी एमआयडीसीचे फलकही आहे. भंडारा व तुमसर तालुका वगळता अन्य तालुक्यांतील एमआयडीसी क्षेत्र नावापुरतेच आहे. भंडारा तालुक्यातील गडेगावजवळील एमआयडीसी परिसरातही अनेक लहान-मोठ्या कंपन्या असल्या, तरी त्यातूनही अनेक कंपन्या डबघाईला आल्या आहेत. तुमसर क्षेत्रात उद्योग संख्या जास्त असली, तरी तिथेही अडीच एकर क्षेत्रात भरपूर राखीव जागा आहे. याशिवाय लाखांदूर, साकोली, पवनी एमआयडीसी क्षेत्र अजूनही नावापुरतेच आहे. अनेक ठिकाणी ओसाड जमीन असून, तिथे एकाही उद्योगाची पायाभरणी होऊ शकली नाही. मागासल्या समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात राजकीय वजन कमी पडल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे अनेकजण सांगतात.
बॉक्स
घोडे कुठे अडले
भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. नैसर्गिक संसाधनांच्याबाबतीत विपुल असला, तरी राजकीय इच्छाशक्ती व निधीची वानवा यामुळेच एमआयडीसी क्षेत्र विकसित होण्यापासून मागे पडले. पाण्याची उपलब्धता असतानाही कंपनी क्षेत्र सुरू करण्यास अनेक अडचणी आल्या आहेत. लहान-मोठे उद्योग नदीकाठशेजारी उभे राहू शकतात; मात्र त्या परिणामाने अनुकूल वातावरण निर्मिती झाली नाही. हेच मोठे कारण उद्योग न येण्यामागे आहे.
बॉक्स
त्या तालुक्यातील जागा ओसाड
भंडारा जिल्ह्यातील एमआयडीसी क्षेत्रात जागा असूनही त्या ठिकाणी उद्योग सुरू झाले नाही. लाखांदूर क्षेत्रातील पूर्वी असलेला साखर कारखाना आता भंगार अवस्थेत उभा आहे. तांत्रिक व निधीची वानवा यामुळे अनेक कंपन्या निर्माण होण्यापूर्वीच डबघाईस येतात. त्यामुळे उद्योग सुरू होऊनही काही वेळातच त्याची अधोगती होते. याला बऱ्याच प्रमाणात राजकीय अनास्थाही कारणीभूत असते.
कोट बॉक्स
रोजगार मिळेल हे स्वप्नच
भंडारा जिल्हा नैसर्गिक साधनसंपत्तीने स्वयंपूर्ण आहे. मात्र रोजगाराच्याबाबतीत स्वयंपूर्ण नाही. जिल्ह्यात अन्य राज्यातील कामगार येथे काम करतात; परंतु स्थानिकांना प्राधान्य दिले जात नाही, हीच प्रमुख समस्या आहे.
- महेश रामटेके, भंडारा.
कोट बॉक्स
शिक्षण पूर्ण झाल्यावर तब्बल चार वर्षांपासून रोजगारासाठी विविध कंपन्यांमध्ये अर्ज व बायोडाटा सादर केला. अनेक ठिकाणी वशिलेबाजी असल्याने काम मिळत नाही. हाताला जे काम मिळेल ते करीत आहे. रोजगार मिळेल हे माझ्यासाठी तरी स्वप्नच आहे. - नागेंद्र हजारे, भंडारा.
कोट बॉक्स
जिल्ह्यात रोजगार निर्मितीला प्रचंड वाव आहे; मात्र लोकप्रतिनिधींनी त्यावर लक्ष घालायला हवे. आमचे वयोमान वाढत आहे; मात्र हाताला काम नाही. तालुक्यातच कंपनी असूनही आम्हाला तिथे प्राधान्य दिले जात नाही. याकडे जिल्हा प्रशासनानेही लक्ष देण्याची गरज आहे.
- अंकिता आंबीलढुके, भंडारा.