भंडारा: शनिवारी पहाटेच्या सुमारास घडलेली घटना मानवी मनाला सुन्न करून टाकणारी आहे. जीव गेलेल्या निष्पाप बालकांना आपण परत आणू शकत नाही. परंतु या घटनेपासून सर्वांनी बोध घ्यायला हवा. फक्त रुग्णालयाच नव्हे तर सर्वच शासकीय कार्यालयांचे फायर ऑडिट व सदर यंत्रणा स्थापित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अशी बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली.
रविवारी सकाळी ११ वाजता जिल्हा रुग्णालयात घडलेल्या अग्नितांडवाचीपाहणी केल्यानंतर ते पत्रकारांना संबोधीत करत होते. खासदार पटेल म्हणाले की, प्रारंभिक चौकशी झाल्यानंतरच चूक कुणाची आहे, याला दोषी कोण आहे, हे कळणार आहे. त्याबाबत आधीच भाष्य करणे योग्य नाही. परंतु जिल्हा रुग्णालयासह सर्वत शासकीय कार्यालयांमध्ये फायर ऑडिट होणे आता अत्यंत महत्वाचे आहे. शासकीय दवाखान्यांमध्ये सुधारणा करणेही तेवढेच महत्त्वाचे असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जी यंत्रणा प्रभावी स्वरूपाने उपलब्ध व्हायला हवी यावर विचार करून त्याची पूर्तता करण्यावर आमचा भर राहील.
उल्लेखनीय म्हणजे कालच्या दुःखद घटनेनंतर स्मोक डिटेक्टर यासह फायर फायटिंग उपकरणची व्यवस्था असती तर निश्चितच झालेली हानी कमी स्वरूपात झाली असती. त्यामुळे यावर तातडीने अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. या गंभीर व संवेदनशील विषयावर कुठलेही राजकारण न करता मानवी दृष्टिकोनातून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याबाबत प्रयत्न करावेत, असेही खासदार प्रफुल पटेल म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार राजू कारेमोरे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी खासदार मधुकर कुकडे, धनंजय दलाल, यशवंत सोनकुसरे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.