अशोक पारधी ।आॅनलाईन लोकमतपवनी : विदर्भासाठी पर्यटनाचे प्रमुख केंद्र होण्याची क्षमता असलेल्या पवनी नगरातील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित आहे. शासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधींनी अनेकदा पाहणी केली. पर्यटन विकास निधीतून ढासळत असलेल्या घाटांचे पुनरूज्जीवन करण्याचा संकल्प केला. मात्र जबाबदारी घेणार कोण? असा प्रश्न निर्माण झाल्याने पुनरजीवनाचा संकल्प हवेतच विरला आहे.पवनी नगर व परिसर पर्यटन स्थळांनी समृध्द आहे. महत्वाकांक्षी असलेल्या गोसेखुर्द प्रकल्प, उमरेड- पवनी-कऱ्हांडला अभयारण्याचा महत्त्वपूर्ण भाग, सिंदपुरी रूयाळ येथील आंतरराष्ट्रीय महासमाधीभूमी परिसर, अष्टविनायकापैकी एक पंचमुखी गणेश मंदिर, स्वयंभू धरणीधर गणेश, रांझीचा महाकाय गणपती, वैजेश्वर मंदिर, जगन्नाथ स्तुप, चंडिकापूर स्तुप, ऐतिहासिक परकोट व जवाहरगेट आणि दैनावस्था झालेला दिवाणघाट व नगरातील मंदिर असा व्यापक पसारा असलेला पर्यटन स्थळांचा महत्त्वपूर्ण गाव आहे. पंरतु पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सुविधा मात्र येथे नाहीत. कोणत्याच लोकप्रतिनिधींना पर्यटन विकासाची ईच्छशक्ती नसल्यामुळे दिवाण घाटासारखा ऐतिहासिक वारसा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.भारतीय पुरातत्व विभागाने जवाहर गेट व परकोट याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे त्या स्थळांची देखभाल दुरूस्ती होत आहे. वैजेश्वर घाटाला महत्त्व दिल्याने लोकप्रतिनिधी व पर्यटन विकास निधीमधून काही प्रमाणात विकास झालेला दिसतो. पंरतु दिवाणघाट, पानखिडकी हे घाट अद्यापही विकासाच्या प्रतिक्षेत आहेत.भारतीय पुरातत्व विभाग महाराष्ट्र पर्यटन विकास, नगर पालिका प्रशासन यापैकी कोणीतरी नामशेष होत असलेल्या या घाटांच्या पुनरुज्जीवनासाठी जबाबदारी घ्यावी, पर्यटनाला चालना देऊन पवनी शहराचा विकास करण्याचा संकल्प केला तरच पर्यटनाच्या नकाशावर पवनीचे नाव कोरल्या जाईल. अन्यथा आठवणी तेवढ्या छायाचित्रापुरते शिल्लक राहतील, यात शंका नाही.
पवनीचा ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 11:15 PM
विदर्भासाठी पर्यटनाचे प्रमुख केंद्र होण्याची क्षमता असलेल्या पवनी नगरातील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित आहे. शासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधींनी अनेकदा पाहणी केली.
ठळक मुद्देना लोकप्रतिनिधींचे लक्ष ना सरकारचे : अन्यथा हा वारसा ठरणार छायाचित्रापुरता