नगर परिषदेच्या नेहरू ग्राऊंडने घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:36 AM2021-01-23T04:36:02+5:302021-01-23T04:36:02+5:30
: मैदानाचे झाले सपाटीकरण २२ लोक ०८ के तुमसर : कोरोना काळात तुमसर शहरातील भाजीपाला बाजारात होणारी गर्दी ...
: मैदानाचे झाले सपाटीकरण
२२ लोक ०८ के
तुमसर : कोरोना काळात तुमसर शहरातील भाजीपाला बाजारात होणारी गर्दी टाळता यावी म्हणून स्थानिक नेहरू ग्राउंडवर भाजी बाजार भरविण्यात आला होता. परिणामी सराव करणाऱ्या खेडाळू युवक, युवती व लहान मुलांना सराव करण्यात अडचण होत होती. शिवाय भाजी बाजारामुळे मैदानात खड्डे निर्माण झाले होते. खेडाळूंची अडचण लक्षात घेत नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी पुढाकार घेऊन भाजी बाजार स्थलांतरित केला. त्याचबरोबर मैदानाचे सपाटीकरण केल्याने अखेर नेहरू ग्राऊंडने मोकळा श्वास घेतला आहे.
तुमसर शहराला लाभलेल्या एकमेव नगरपरिषदेच्या मालकीच्या नेहरू ग्राऊंडवर कोरोना काळात भाजी बाजारात होणारी गर्दी टाळता यावी म्हणून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून शहरात भाजी बाजार लावण्यात आले होते. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली तशी तुमसर शहरातील खेडाळू युवक, युवती नियमितपणे सराव करण्याकरिता ग्राऊंडवर येत होते. मात्र, ग्राऊंडवर सरावाला अडचणी येत असल्याने शहरातील युवकांनी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांच्याकडे भाजी बाजार स्थलांतरित करण्याची मागणी केली. प्रदीप पडोळे यांनी लगेच नेहरू ग्राऊंडवर भरविण्यात येणारा भाजी बाजार लगतच्या हुतात्मा स्मारकाजवळ भरविण्याकरिता व्यवस्था करून दिली. ग्राऊंडवर भाजी बाजार भरत असल्यामुळे मैदानात अनेक छोटे मोठे खड्डे पडून मैदान पूर्णतः खराब झाले होते. परिणामी नगराध्यक्षांनी पालिकेचे कर्मचारी व सराव करणाऱ्या युवकांसोबत जेसीबी मशीन लावून मैदानावर मुरुम, पाखण माती घालून त्यावर रोड रोलर चालवून मैदानाचे सपाटीकरण केले. सराव करणाऱ्या खेडाळू युवक, युवती तसेच लहान मुलांना मैदान मोकळे करून दिले. तसेच मैदानावरील विद्युत खांब हटविण्यासाठी प्रदीप पडोळे यांनी विद्युत विभागाला निर्देश दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष अमरनाथ रगडे उपस्थित होते. त्यामुळे सराव करणाऱ्या खेडाळूंमधून आनंद व्यक्त होत आहे.