राजू बांते
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : बसचा पास मिळत नाही, अन मानव विकास योजनेतून सायकलही मिळत नाही. सावित्रीच्या लेकींना संघर्ष करत शाळेत येण्यासाठी दररोज पायपीट करावी लागत आहे. अतिमागास तालुक्यातील आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या शाळेपासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू मुलींना सायकल वाटप करण्याची योजना महाराष्ट्र राज्य मानव विकास मिशनमार्फत राबविली जाते. गरजू मुलींना सायकल वाटपचे मिशन गत वर्षीपासून थांबविण्यात आले आहे.
दोन वर्षांपासून कोविड-१९ या विषाणूचे सावट आहे. त्यामुळे शाळा प्रभावित झाल्या. मागील वर्षी काही महिने शाळा सुरू झाल्या होत्या. आता ग्रामीण भागातल्या शाळा १५ जुलैपासून सुरू झाल्या आहेत. परंतु, शाळेत येण्यासाठी सार्वजनिक साधनांचा वापर करण्यास शासनाने मनाई केली आहे. पालकांनी मुलांना शाळेत सोडून द्यावे, अशा सूचना आहेत. त्यामुळे शाळेत येण्यासाठी गाव ते शाळा या दरम्यान सर्व मुलींना मोफत प्रवासासाठी एसटी बसची सोय उपलब्ध नाही. अहिल्याबाई होळकर या योजनेतून मुलींसाठी मोफत पासही दिला जात नाही. त्यामुळे दुर्गम भागातून व अन्य ठिकाणांहून शाळेत येण्यासाठी अनेक मुलींना संघर्ष करावा लागत आहे. पायपीट करत शाळा गाठावी लागत असल्याने मुलींची दमछाक होत आहे. शाळा सुरू होऊन दोन आठवडे झाले आहेत. दुर्गम भागातून पावसाळ्यात दूरवरून मुली शाळेत येताना असुरक्षित असल्याची भीती व्यक्त करीत आहेत. मुलींना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, त्यांचे शाळा गळतीचे प्रमाण रोखणे, हा उद्देश मानव विकास योजनेचा आहे. पण, मुलींना शाळेत येण्यासाठी सध्या साधन उपलब्ध करून दिले नसल्याने अनेक मुली शाळा सुरू होऊनही शाळेत येत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
मानव विकास योजनेतून मुलींना सायकल खरेदी करण्यासाठी तीन हजार ५०० रुपये अनुदान दिले जाते. तथापि, मागील वर्षी कोरोनाचा प्रभाव मानव विकास योजनेवर झाला. अनुसूचित जातीच्या १७० मुलींना अनुसूचित उपयोजना या योजनेतून सायकलसाठी निधी देण्यात आला. इतर प्रवर्गातील मुलींना सायकल खरेदीसाठी निधी दिला गेला नाही. त्यामुळे मागील वर्षीपासून वंचित असणाऱ्या सावित्रीच्या लेकी शाळेत पायी येत आहेत. यावर्षी तरी मुलींना सायकल खरेदी करण्यास शासन निधी उपलब्ध करून देणार आहे का, असा प्रश्न मुलींचे पालक विचारात आहेत.
कोविडमुळे मोजक्याच योजनेसाठी निधी प्राप्त झाला होता. तो सर्व निधी वाटप करण्यात आला आहे. मागील वर्षभर शाळा सुरू नसल्याने नियमित योजना शासनाने राबविली नाही. जूनमध्ये शासनाकडून मार्गदर्शक सूचना येतात. पण अजूनपर्यंत कसल्याही सूचना आल्या नाहीत.
- वसुंधरा फाळके
सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी, भंडारा
मानव योजनेच्या बस सुरूबाबत सूचना आल्या नाहीत. अहिल्याबाई होळकर या योजनेंतर्गत मुलींना शाळेत येण्यासाठी बस पास देणे सुरू आहे.
युधिष्ठीर रामचौरे
व्यवस्थापक, एसटी आगार, तुमसर
कोविडच्या प्रभावामुळे शासनाने अनेक योजनांच्या खर्चावर कात्री लावली आहे. यात शिक्षणविषयक योजनेतील मुलींना शाळेत येण्यासाठी सायकल निधीचा समावेश आहे. यावर्षीसुध्दा जिल्हाधिकारी कार्यालयाला शासन स्तरावर कोणत्याच सूचना आल्या नाहीत. त्यामुळे यावर्षीही मुली सायकल योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता दिसत आहे.