: ये-जा करणाऱ्यांची इत्थंभूत माहितीची नोंद
रंजित चिंचखेडे
चुल्हाड ( सिहोरा ) : मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्यांना जोडणाऱ्या मोवाड या आंतरराज्यीय सीमेवर मध्यप्रदेश पोलिसांनी कडक लॉकडाऊन लागू केला आहे. खुद्द तहसीलदार यावर नियंत्रण ठेवत असल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांची इत्थंभूत माहितीची नोंद करण्यात येत आहे. दुसऱ्या टोकावरील बपेरा आंतरराज्यीय सीमेवर शिथिलता देण्यात आली आहे. यामुळे सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाच्या धरण मार्गाचा आश्रय प्रवासी घेत आहेत.
राज्य शासनाने राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन घोषित केले आहे. राज्यात व्यावसायिक व नागरिकांना काही प्रमाणात मुभा देण्यात आली आहे. किराणा, फळ, दूध व्यावसायिकांना शर्ती व नियमांच्या अधीन राहून व्यवसाय करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने शासनाने प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात संशयित रुग्णसंख्येत वाढ झाल्याने अन्य जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आलेल्या आहेत. भंडारा जिल्ह्याचे तुलनेत अन्य सीमावर्ती जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यामुळे भंडारा जिल्ह्यातून अन्य जिल्हा तथा अन्य राज्यात जाताना कसून चौकशी करण्यात येत आहे. परंतु अन्य राज्य व जिल्ह्यांतून भंडारा जिल्ह्यात येत असताना कसून चौकशी करण्यात येत नाही. राज्य सीमेजवळ असणाऱ्या मध्य प्रदेशातील मोवाड सीमेवर पोलिसांची संख्या वाढविण्यात आलेली आहे. या सीमेवर मध्य प्रदेशातील पोलीस आणि तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली असल्याने नियुक्तीचे गांभीर्य लक्षात येत आहे.
खुद्द तहसीलदार सकाळपासून संध्याकाळपर्यंत तळ ठोकून असल्याने मध्य प्रदेश अलर्ट असल्याचे दिसून येत आहे. मध्य प्रदेशातील नागरिक भंडारा जिल्ह्यातून परत आल्यास त्यांना भ्रमणध्वनीवरून घरीच क्वॉरंटाइन होण्याच्या सूचना देण्यात येत आहे. या सीमेवर कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान दुसऱ्या टोकावर भंडारा जिल्ह्यातील बपेरा आंतरराज्यीय सीमेवर पोलीस तैनात आहेत. परंतु सीमेवरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना शिथिलता देण्यात आली आहे. या सीमेवरील पोलीस नागरिकांची इत्थंभूत माहितीची नोंद करीत नाहीत. यामुळे ये-जा सुरू आहे. सीमेवरील पोलीस ये-जा करणाऱ्या नागरिकांना मास्क व सोशल डिस्टसिंगचे पालन करण्याचे सूचना देत आहेत.
बॉक्स
सोंड्याटोला धरण मार्गावरील वाहतुकीत वाढ
महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्याची सीमा बावनथडी नदीने विभक्त केली आहे. याच नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्यासाठी नदीवर धरण बांधण्यात आले आहे. या धरण मार्गाला चोर मार्ग असेही परिसरात नाव देण्यात आले आहे. अवैध साहित्याची आयात, वन्यप्राण्यांची शिकार याच मार्गावरून करण्यात येत आहे. पळ काढण्यासाठी हा मार्ग सुरक्षित आहे. मोवाड व बपेरा सीमा सील असल्याने या राज्य मार्गावरून ये-जा करणाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांचा ससेमिरा लागत नसल्याने वाहनचालक धरण मार्गावरून ये-जा करीत आहेत. या मार्गावर टेन्शन नाही. कुणी विचारपूस करीत नाही. यामुळे बेधडक वाहतूक सुरू आहे.