दोन दशकांपासून शासकीय सेवेत सामावून न घेतल्याने भंडाऱ्यात प्रकल्पग्रस्त तरुणाची ‘विरूगिरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 10:31 AM2017-12-14T10:31:48+5:302017-12-14T10:35:36+5:30
प्रकल्पग्रस्तांतर्गत कुटुंबातील एका सदस्याला दोन दशकांचा कालावधी लोटूनही शासकीय सेवेत सामावून न घेतल्यामुळे त्रस्त झालेल्या युवकाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील झाडावर चढून विरुगिरी केली.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : प्रकल्पग्रस्तांतर्गत कुटुंबातील एका सदस्याला दोन दशकांचा कालावधी लोटूनही शासकीय सेवेत सामावून न घेतल्यामुळे त्रस्त झालेल्या युवकाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील झाडावर चढून विरुगिरी केली. यावेळी झाडावर चढून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ४५ मिनिटांपर्यंत खळबळ उडाली होती. विनोद दागोजी ढोरे रा.सरांडी (ता.लाखांदूर) असे विरुगिरी करणाऱ्या या तरुणाचे नाव आहे.
सरांडी येथील विनोद ढोरे हा उच्चशिक्षित असून त्याची वडीलोपार्जीत शेतजमीन गोसे धरणाच्या डाव्या कालव्याकरिता संपादीत करण्यात आली आहे. जनहितासाठी कार्य करताना माझा विरोध नाही, मात्र कुटुंबाच्या पालनपोषणाकरिता शासकीय नियमाप्रमाणे शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी विनोदने अनेकदा जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांनाही पाठविलेल्या निवेदनातून केली होती. विनोदचे वय वाढल्याने त्याला नोकरी मिळणे शक्य नसल्याने कुटुंबातील अन्य व्यक्तीला तरी शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशी मागणीही ढोरे यांनी केली. मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. अखेर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी पूर्ण न झाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला.
बुधवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कडूलिंबाच्या झाडावर चढून स्वत:वर पेट्रोल टाकले. तसेच माझ्या मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात, अन्यथा येथेच आत्मदहन करणार, अशी तंबी दिली. यावेळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह असंख्य नागरिकांनी गर्दी केली. यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, एसडीपीओ संजय जोगदंड यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी झाडाभोवती गराडा घालून होते. पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता.
जिल्हाधिकाऱ्यांनी काढली समजूत
मी सुद्धा एक प्रकल्पग्रस्त आहे. तुमच्या भावना मी ओळखू शकतो. परंतु मागणी पूर्ण करण्यासाठी आपण अवलंबिलेला मार्ग योग्य नाही. चर्चेतूनच मार्ग निघू शकतो. यासाठी आपणाला खाली येऊन माझ्या दालनात चर्चा करावी, अशी मी ग्वाही देतो, अशी समजूत चक्क जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी विरुगिरी करणाऱ्या विनोद ढोरे याची काढली. यावेळी जिल्हाधिकारी व विनोद ढोरे यांच्यातील होत असलेली चर्चा उपस्थितांनी शांतपणे ऐकून घेतली. विनोदनेही जिल्हाधिकाऱ्यांचा मान ठेवत चर्चेसाठी तयार झाला. ४० मिनिटानंतर झाडावरून उतरल्यावर पोलिसांनी त्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षापर्यंत नेले.
आश्वासन मिळाले
जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी विनोद ढोरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विनोदचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी त्यांनी ढोरे यांच्या रास्त मागण्या शासनापर्यंत पोहचवून त्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी विनोद ढोरे यांना दिले.