आता मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेण्याची गरज
By admin | Published: June 9, 2017 12:37 AM2017-06-09T00:37:10+5:302017-06-09T00:37:10+5:30
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी राज्यात एकीकडे आंदोलनाचे सत्र सुरू असताना दुसरीकडे
नाना पटोले : शेतकरी आत्महत्यांनी व्यथित
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी राज्यात एकीकडे आंदोलनाचे सत्र सुरू असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्रही कायम आहे. अशावेळी शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. असे असताना राज्याचे मुख्यमंत्री वेळकाढू धोरण अवलंबित आहे. मुख्यमंत्री महोदय, कर्जमाफीसाठी आणखी किती शेतकरी आत्महत्यांची वाट पाहणार असा संतप्त सवाल खासदार नाना पटोले यांनी केला.
खोलमारा येथील ईश्वर मदनकर या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियाचे सांत्वन करण्यासाठी आले असता त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आपण स्वत: गंभीर असून राजकारण बाजुला ठेऊन मी शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहीन. काँग्रेसमध्ये असताना आमदारपदाचा राजीनामा दिला होता, याची आठवण करून देत संकटातील शेतकऱ्यांना सावरण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी खा. नाना पटोले म्हणाले, मागील अनेक वर्षांपासून नापिकी, दुष्काळ अशा विविध संकटांनी शेतकरी त्रस्त असून शेतकऱ्याला तात्काळ मदतीची गरज आहे. कर्जमाफीबाबत आपण अनेकवेळा मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मात्र मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नांना गांभीर्याने घेत नाही. शेतकरी जगला पाहिजे, शेतकऱ्यांनी आंदोलने थांबली पाहिजेत. ईश्वर मदनकर सारख्या तरूण शेतकऱ्याने आत्महत्या करावी, ही अत्यंत लाजिरवाणी घटना आहे. मी प्रथम शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारा जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. शेतकरी जगला पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही माझी पहिली मागणी आहे. यापूर्वीही आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पेठून उठल्याची आठवण त्यांनी करून दिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी करीत शेतकऱ्यांच्या पाठिशी कालही होतो, आजही आहे आणि उद्याही राहणार असल्याचे स्पष्ट केले.