जिल्ह्यात रुग्णसंख्या शून्यावर; निर्बंध कधी शिथिल होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:37 AM2021-07-30T04:37:12+5:302021-07-30T04:37:12+5:30
भंडारा : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता जिल्ह्यात पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या जवळजवळ शून्यावर आली आहे. जुलै महिन्यात केवळ २० पाॅझिटिव्ह ...
भंडारा : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता जिल्ह्यात पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या जवळजवळ शून्यावर आली आहे. जुलै महिन्यात केवळ २० पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. १५ दिवस तर एकही रुग्ण आढळून आला नाही; तर ॲक्टिव रुग्णांची संख्या केवळ आठ आहे. अशी स्थिती असतानाही जिल्ह्यात मात्र निर्बंध कायम आहेत. सायंकाळी ४ वाजताच बाजारपेठ बंद होत असल्याने व्यापाऱ्यांसह लघुव्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. कोरोना रुग्णसंख्या शून्यावर येत असल्याने जिल्ह्याचे निर्बंध शिथिल करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.
कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जून महिन्यापासूनच रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. जुलै महिन्यात तर पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या अगदी बोटावर मोजण्याएवढी आहे. १ ते २९ जुलै दरम्यान जिल्ह्यात सुमारे १८ हजार व्यक्तींची चाचणी केल्यानंतर केवळ २० व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. १५ दिवस तर एकही रुग्ण आढळून आला नव्हता. विशेष म्हणजे या २९ दिवसात कुणाचाही मृत्यू झाला नाही. जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर असून केवळ आठ ॲक्टिव रुग्ण आहेत. अशी स्थिती असतानाही कोरोना संसर्गाचे नियम मात्र पूर्वीप्रमाणेच सुरू आहेत.
जिल्ह्यात सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंतच बाजारपेठ सुरू ठेवण्यात येत आहे. ४ वाजता दुकान बंद होत असल्याने छोटे व्यावसायिक अनेक व्यापाऱ्यांवर त्याचा मोठा परिणाम जाणवत आहे. सायंकाळच्या वेळी खाद्यपदार्थांची विक्री करणारे व्यावसायिक तर या निर्बंधाने उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हाॅटेल व्यवसाय खरे तर सायंकाळपासूनच सुरू होते. परंतु निर्बंध असल्यामुळे हा व्यवसायही जिल्ह्यात पूर्णत: बंद झाला आहे. आता कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्याने निर्बंध शिथिल करावे, अशी मागणी होत आहे. निर्बंध शिथिल होत नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे.
बाॅक्स
नोकरांचे वेतन अन् कर्जाचे हप्ते थकले
भंडारा शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला आहे; परंतु गत दोन वर्षापासून कोरोना संसर्गामुळे संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला आहे. अनेकांचे कर्जाचे हप्ते थकीत आहेत. बँकांचे कर्ज कसे भरावे असा प्रश्न पडला आहे. दुसरीकडे दुकानात असलेल्या नोकरांना वेतन देणेही कठीण झाले आहे. अशा स्थितीत निर्बंध उठले नाही तर व्यापारी उद्ध्वस्त होतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
बाॅक्स
बाजारपेठ बंद; नागरिक मात्र रस्त्यावर
कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून जिल्ह्यात सायंकाळी ४ वाजेनंतर अंशत: संचारबंदी आहे. व्यापारी आपली प्रतिष्ठाने वेळेवर ४ वाजता बंद करतात. दुकान बंद केले नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते. दुसरीकडे नागरिक मात्र रात्री उशिरापर्यंत गर्दी करून असतात. कुणीही मास्क लावत नाही की फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनही करीत नाही.
कोट
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षणीय कमी झाले आहे. परंतु व्यापाऱ्यांवर वेळेचे निर्बंध कायम आहे. अर्थकारणावर याचा मोठा परिणाम झाला आहे. लहान व्यापाऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. दुकाने ४ वाजता बंद करण्याची अट शिथिल करावी, असे निवेदन आपण जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
-डाॅ.परिणय फुके, आमदार
कोरोना संसर्गाचे निर्बंध शिथिल करण्याबाबत कोणत्याही सूचना नाही. शासनाकडून तसा कोणताही प्रस्ताव मागविण्यात आला नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे निर्बंध कायम आहेत.
-संदीप कदम, जिल्हाधिकारी भंडारा