तुमसर : जिल्ह्यातील कार्यालयाचा कारभार प्रभारीवर असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात कामे अडकून पडली आहेत. कार्यालयातील नागरिकांची कामे तात्काळ व्हावीत यासाठी पूर्णवेळ अधिकारी देण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा महासचिव गौरीशंकर मोटघरे यांनी निवेदनातून केली आहे. जिल्ह्यातील भूमिअभिलेख कार्यालय हे प्रभारींच्या खांद्यावर असल्याने ते अधिकारी आपल्या सवडीनुसार कार्यालयात येत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांची कामे लांबणीवर टाकली जात आहेत. भूमिअभिलेख कार्यालयामार्फत भूमापन, शेतीमापन, शेतीच्या सातबारावर फेरफार आदींसह शहरी भागातील प्लॉटचे फेरफार करण्याचे कामही या कार्यालयामार्फत केले जाते. मात्र, पूर्णवेळ अधिकारीच या कार्यालयात उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात कामे अडकून पडू लागली आहेत. या पदावर अद्याप पूर्णवेळ अधिकारी देण्यात आलेला नाही. त्यामुळे अधिकारीवर्ग आपल्या सवडीनुसार कार्यालयात ये-जा करीत आहेत. परिणामी, अधिकाऱ्यांचे कार्यालयाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिकांची कामे लांबणीवर पडली असून नागरिकांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सोसावा लागत असल्याने तात्काळ जिल्ह्यातील भूमिअभिलेख कार्यालयात पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी गौरीशंकर मोटघरे यांनी निवेदनातून केली आहे
प्रभारी अधिकाऱ्यामुळे भूमिअभिलेख कार्यालयातील कामे खोळंबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 4:30 AM