लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेसोबतच म्युकरमायकोसिस आजारही आला. आतापर्यंत जिल्ह्यात या आजाराचे १३ रुग्ण आढळले असून, यात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत पावलेली रुग्ण ही महिला असून, ती साकोली तालुक्यातील रहिवासी होती.
म्युकरमायकोसिस या आजाराने मे महिन्यात जिल्ह्यात शिरकाव केला होता. सुरुवातीला दोन, तर त्यानंतर पाच रुग्ण संख्या झाली होती. दरम्यान, महिनाभराच्या काळात रुग्णसंख्या १३ पर्यंत पोहोचली आहे. यापैकी चार रुग्ण भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर अन्य सात रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असून, काहींना नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी या आजाराने एका पुरुष रुग्णाचाही मृत्यू झाला होता. उल्लेखनीय म्हणजे, १३ रुग्णांपैकी दोनजणांचे डोळे कायमस्वरूपी निकामी झाले आहेत.
परिणामी तज्ज्ञांनी, रुग्णांनी वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन केले आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य प्रशासनाने या आजारासंदर्भात मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. जिल्हा रुग्णालयात याबाबत उपचार केले जात असल्याचे म्हटले आहे.
औषधांचा पुरेसा साठा
भंडारा जिल्हा रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे तीन रुग्ण उपचार घेत असून, अन्य दोन रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या आजारावर प्रभावी असलेली इंजेक्शन्स जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहेत. औषधींची कमतरता नसल्याचेही वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढल्यास त्याअनुषंगाने औषधेही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जेणेकरून भविष्यात औषधांबाबतीत टंचाई उद्भवू नये म्हणून आरोग्य प्रशासनाने त्या दिशेने पाऊल उचलले आहे.
दोनजणांना कायमस्वरूपी अंधत्व
म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून, कोरोनाकाळात अधिक काळ आयसीयु व सातत्याने ऑक्सिजन घेत असलेल्या रुग्णांना होऊ शकतो. या आजाराच्या रुग्णांच्या डोळ्यांवर, नाकावर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. यात दोन रुग्णांचे डोळे कायमस्वरूपी निकामी झाले आहेत. त्यांना कायमस्वरूपी अंधत्व आले आहे. परिणामी कोरोना संक्रमण असताना रुग्णाची काळजी घेणे अंत्यत आवश्यक आहे.
म्युकरमायकाेसिसची प्राथमिक लक्षणे
या आजारात चेहऱ्याचे स्नायू दुखणे, चेहऱ्यावर बधिरपणा येणे, नाकावर सूज येणे, नाकपुडीतून रक्तस्त्राव, काळपट स्त्राव वाहणे, चेहरा अथवा डोळ्यावर सूज येणे, एक पापणी अर्धी बंद राहणे, डोळा दुखणे, वरच्या जबड्याचे दात दुखणे किंवा हलू लागणे, अस्पष्ट दिसणे, ताप येणे अशी लक्षणे दिसू लागतात.
हा अतिजलद पसरणारा बुरशीचा आजार आहे. मुख्यत: तो नाक, डोळे आणि मेंदू या अवयवांना बाधित करतो. वेळेवर उपचार मिळाल्यास हा रोग बरा होऊ शकतो. योग्य उपचार न केल्यास डोळा, दृष्टी किंवा प्राणदेखील जाऊ शकतो. काळजी व डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास या आजारावर मात करणे शक्य आहे.
जिल्ह्यात म्युकरमायकोसिस या आजाराचे एकूण १३ रुग्ण आढळले आहेत. चार रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. काही रुग्ण खासगी रुग्णालयांत आहेत. या आजाराने एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
-डॉ. निखिल डोकरीमारे , अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा
ही घ्या काळजी
रक्तातील साखरेवर काटेकोर नियंत्रण ठेवावे, सोबतच कान, नाक, घसा, नेत्र व दंतरोगतज्ज्ञ यांच्याकडून एक आठवड्यानंतर तपासणी करावी. डॉक्टरांनी सांगितल्यापेक्षा जास्त दिवस स्टिरॉइड घेऊ नये. टुथ ब्रश, मास्क वरचेवर बदलणे, दिवसातून एकदा गुळण्या करणे, स्वच्छता ठेवणे, जमिनीखाली लागणाऱ्या भाज्या स्वच्छ धुवून खाव्यात, मातीत काम व खतांचा वापर करताना काळजी घ्यावी.