जिल्ह्यात तब्बल ८३८ लोकांमागे एकच पोलीस कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:31 AM2021-02-08T04:31:03+5:302021-02-08T04:31:03+5:30
भंडारा : जिल्ह्याची लोकसंख्या अकराव्या जनगणनेनुसार १२ लाख ३३४ इतकी आहे. मात्र, एवढी लोकसंख्या असताना त्या तुलनेत पोलीस कर्मचाऱ्यांची ...
भंडारा : जिल्ह्याची लोकसंख्या अकराव्या जनगणनेनुसार १२ लाख ३३४ इतकी आहे. मात्र, एवढी लोकसंख्या असताना त्या तुलनेत पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या ही नगण्य असल्याचे दिसून येते. १२ लाख ३३४ एवढ्या लोकांचा भार केवळ १४३३ पोलिसांवर असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व पोलिसांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी नवीन पोलीस भरती प्रक्रिया लवकर राबवण्याची गरज आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार ऑनलाइन फसवणुकीचे प्रकारही वाढू लागले आहेत. त्यामुळे फसवणुकीच्या प्रकारासह वेगवेगळ्या गुन्हेगारीला थोपविण्याचे आव्हान जिल्हा पोलीस दलापुढे आहे. सध्या भंडारा जिल्ह्यात १४३३ पोलीस कर्मचारी, १११ पोलीस अधिकारी कार्यरत आहेत. बारा लाख लोकसंख्या असताना ८३८ लोकांची सुरक्षितता केवळ एकाच पोलिसावर आहे. आता कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे हळूहळू सर्वच कार्यक्रमांना शासनाने परवानगी दिली असल्याने मोर्चे, निवडणुका, आंदोलने यांच्यासह अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त करावा लागतो. त्यामुळे जिल्हा पोलीस यंत्रणेवर कामाचा ताण अधिक पडत आहे. मात्र, असे असले तरी मंत्र्यांचे जिल्ह्यात दौरे वाढले असल्याने सुरक्षिततेसाठी पोलिसांना नेहमीच दक्ष राहावे लागत आहे.
बॉक्स
ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या गुन्ह्यांचे पोलिसांपुढे आव्हान
जिल्ह्यात छोट्या-मोठ्या गुन्हेगारीचे प्रमाण हे कमी असले, तरी दिवसेंदिवस ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे वाढत आहेत. इतकेच नव्हे तर राज्यस्तरावर ऑनलाइन पैसे काढल्याच्या प्रकारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला लॉटरी लागली आहे, अल्पावधीत कर्ज मंजूर करून देतो. मी बँकेतून बोलतोय, तुमचा ओटीपी सांगा. तुमचे कर्जाचे हप्ते थकले आहेत, अशी विविध कारणे सांगून ऑनलाइन पद्धतीने प्रकार वाढले आहेत. त्यामुळे पोलीस कर्मचारी हे वाढत्या लोकसंख्येपुढे कमी पडत आहेत. वाढत्या गुन्ह्यांचे आव्हान देण्यासाठी राज्य सरकारने पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याची गरज आहे.
बॉक्स
शेतशिवारातील चोरीच्या घटनांच्या प्रमाणात वाढ
जिल्ह्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जिल्ह्यात एमआयडीसीचा म्हणावा तसा विकास न झाल्याने शेती हाच अनेकांचा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात लावलेले मोटारपंप तसेच केबल वायर, पॅकहाउस बांधकाम केलेल्या साहित्याची चोरी तसेच शेळीपालन असलेल्या ठिकाणी बोकडचोरी केलेल्या गुन्ह्यांच्या प्रमाणात या वर्षी वाढ झाली आहे. त्यामुळे शहरापेक्षाही ग्रामीण भागातील शेतशिवारातून कृषीपंपचोरी होण्याच्या घटना वाढल्या असल्याने त्यांना रोखण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे.
जिल्ह्याची लोकसंख्या १२,००,३३४
जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी १४३३