त्रुटी दूर करूनच पुलाचे काम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:06 AM2021-03-04T05:06:04+5:302021-03-04T05:06:04+5:30
भंडारा : गोसेखुर्द पुनर्वसन विभागाच्या वतीने कारधा ते खडकी या मार्गावर करचखेड्याजवळ नाल्यावर पूल बांधण्यात येत आहे. हा पूल ...
भंडारा : गोसेखुर्द पुनर्वसन विभागाच्या वतीने कारधा ते खडकी या मार्गावर करचखेड्याजवळ नाल्यावर पूल बांधण्यात येत आहे. हा पूल तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या पद्धतीने बांधण्यात येत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर खासदार सुनील मेंढे यांनी प्रत्यक्ष पुलाची पाहणी केली व संबंधित कार्यकारी अभियंत्यांना चुका दुरुस्त करून योग्य पद्धतीने नियोजन करीत पुलाचे काम करण्याच्या सूचना केल्या.
गोसेखुर्द प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रात येत असलेल्या या मार्गाची उंची वाढवून त्या ठिकाणी पूल निर्माण करण्याचे काम गोसेखुर्द पुनर्वसन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. करचखेडा या गावात तयार होत असलेला हा पूल चुकीच्या पद्धतीने उभारला जात असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद बांते यांनी खासदार सुनील मेंढे यांना सांगितले. या तक्रारीच्या आधारे मेंढे यांनी प्रत्यक्ष पुलाची पाहणी करण्यासाठी भेट दिली. बांधकाम करताना दोन्ही बाजूंना पुलाच्या बाजू भरण्यासाठी काळ्या मातीचा वापर केला आहे.
ही माती कोणत्याही क्षणी खचून जाण्याची शक्यता आहे. यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. सोबतच पूल संपतो त्या ठिकाणी लगेच वळण दिले असल्याने तेथेही धोक्याची दाट शक्यता आहे. या दोन्ही गोष्टी पुलाच्या आणि प्रवाशांच्या दृष्टीने घातक आहेत. या दुरुस्त होणे गरजेचे आहे ही गोष्ट लक्षात घेत खासदार सुनील मेंढे यांनी ताबडतोब पुनर्वसन विभागाचे कार्यकारी अभियंता इंदुरकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून या त्रुटी दूर करून कामाचे पुन्हा नियोजन करून व्यवस्थित काम करण्याचे निर्देश त्यांना दिले. कार्यकारी अभियंत्यांनी लवकरच हा विषय मार्गी लावू, असे सांगितल्याचे समजते. या भेटी दरम्यान भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद बांते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.