शारीरिक विकासासाठी मैदानी खेळ आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:35 AM2021-01-23T04:35:51+5:302021-01-23T04:35:51+5:30
अड्याळ : मातीचा खेळ महाराष्ट्रात रूतला, रूजला पाहिजे. खऱ्या अर्थाने अंगाला माती लागल्याशिवाय खेळ होऊ शकत नाही. म्हणून ...
अड्याळ : मातीचा खेळ महाराष्ट्रात रूतला, रूजला पाहिजे. खऱ्या अर्थाने अंगाला माती लागल्याशिवाय खेळ होऊ शकत नाही. म्हणून कबड्डी या खेळाला महत्त्व प्राप्त झाले आहे. शारीरिक विकास करायचा असेल तर नियमितपणे व्यायाम आणि मैदानी खेळ हे अतिशय महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री विलासराव शृंगारपवार यांनी केले. अड्याळ येथे रात्रकालीन कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सर्पमित्र फ्रेंड्स ग्रुप तथा जय बजरंग कबड्डी क्रीडा मंडळ, स्वरक्षण टीम तसेच समस्त ग्रामवासी, अड्याळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवस रात्रकालीन दोन दिवसीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या संख्येने व उत्साहात पार पडले. या स्पर्धेचे उद्घाटन माजी शिक्षण राज्यमंत्री विलासराव शृंगारपवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेंद्र हजारे, सरपंच जयश्री कुंभलकर, कवलेवाडाचे माजी सरपंच मोहन घोगरे, मुख्याध्यापक अनिल हरडे, महेश कुंभलकर, राजू वंजारी, अतुल मुलकलवार, अमोल उराडे, आशिक नैताम व मंडळी उपस्थित होते. अड्याळ गावात दरवर्षी कबड्डीचा सामना रंगायचा आणि ते सामना पाहायला अड्याळ आणि परिसरातील ग्रामवासी मोठ्या संख्येने येत असतात. पण ब्रेक झाल्यानंतर आता पुन्हा हा सामना आयोजकांनी आयोजित केल्याने युवकांना व कबड्डी खेळाडू यांना एक नवीन ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे मत शृंगारपवार यांनी व्यक्त केले. अड्याळमध्ये दोन दिवस रात्रकालीन होणाऱ्या कबड्डी स्पर्धेत आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक कबड्डी खेळाडूंनी आपल्या टीमची नोंदणी केल्यामुळे येथील सामने मनोरंजक होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी आयोजकांनी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्याची माहिती आहे. कबड्डी सामना पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दीच गर्दी पाहायला मिळते. आता यामध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकाचे विजेते कोण ठरतात, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
Attachments area