रुग्णाच्या नातेवाइकांनी केली हॉस्पिटलमध्ये तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:33 AM2021-04-15T04:33:54+5:302021-04-15T04:33:54+5:30
परसवाडा : रुग्णाला भरती न केल्याने नातेवाइकांनी रुग्णालयात तोडफोड करून डॉक्टरांना शिविगाळ व मारण्याची धमकी दिली. तिरोडा ...
परसवाडा : रुग्णाला भरती न केल्याने नातेवाइकांनी रुग्णालयात तोडफोड करून डॉक्टरांना शिविगाळ व मारण्याची धमकी दिली. तिरोडा येथील खैरलांजी मार्गावरील दया हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे.
प्रकरण असे की, महेंद्र परिहार (रा. बोदा, अत्री), संजय प्रीतीचंद येडे, अनिल प्रीतीचंद येडे व जितेंद्र प्रीतीचंद येडे (तिन्ही रा. पार्डी, नागपूर) हे रुग्णाला बेशुद्धावस्थेत घेऊन आले. यावेळी डॉ. संदीप विठ्ठलराव मेश्राम (रा. झाकीर हुसेन कॉलनी) यांनी रुग्णाला तपासून रुग्ण गंभीर आहे. बेड उपलब्ध नसल्यामुळे गोंदियाला घेऊन जा, असा सल्ला दिला. यावर रुग्णाला भरती का करीत नाही म्हणून महेंद्र परिहार, संजय येडे, अनिल येडे व जितेंद्र येडे यांनी फिर्यादीला थापड मारली तसेच केबिनची काच फोडण्याचा प्रयत्न केला. ऑक्सिजन सिलिंडरला लाथ मारून खाली पाडले व रुग्णाच्या बेडला लाथ मारून दवाखान्यातील काचेच्या दाराची तोडफोड करून ५० हजार रुपयांचे नुकसान केले तसेच डॉ. मेश्राम यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली आहे.
प्रकरणी डॉ. मेश्राम यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम ४५२, ४२७, ३२३, ५०४, ५०६, ३४ सहकलम ४ महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय संस्था (हिंसक कृत्य व मालमत्ता हानी व नुकसान प्रतिबंध अधिनियम - २०१०) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तसेच गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनात सपोनि. हनवते हे तपास करीत आहेत.