शेतकऱ्यांना धानाचे चुकारे व बोनस अदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:37 AM2021-05-07T04:37:03+5:302021-05-07T04:37:03+5:30

भंडारा : जिल्हा पणन विभागाने वेळीच दखल घेऊन भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी बांधवांचे धानाचे थकीत चुकारे तसेच बोनस ...

Pay grains and bonuses to farmers | शेतकऱ्यांना धानाचे चुकारे व बोनस अदा करा

शेतकऱ्यांना धानाचे चुकारे व बोनस अदा करा

Next

भंडारा : जिल्हा पणन विभागाने वेळीच दखल घेऊन भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी बांधवांचे धानाचे थकीत चुकारे तसेच बोनस तत्काळ अदा करून तूर्त दिलासा देण्याची तसदी घ्यावी, अशी मागणी भीम शक्ती संघटनेने केली आहे.

भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी खरीप हंगामात धान पिकांचे उत्पन्न घेत असतात. यासाठी शेतकरी बांधवांना बँका व सावकारी कर्ज काढून शेतीची मशागत आणि पीक लागवड करावी लागते. शेतात भात पिकाची लागवड झाल्यानंतर भात पिकाला एखाद्या लहानशा पोराप्रमाणे जपावे लागते. परंतु, कधी वातावरणीय बदलामुळे, कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट कोसळत असतात, तर कधी वनस्पतीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने भात पिकावर विपरीत परिणाम होत असल्याने पीक उत्पादनात बरीच घट येत असते. परंतु शेतकरी बांधवांना कर्जाची परतफेड विहित कालावधीत करावी लागत असल्याने लवकर मळणी करून नोव्हेंबर महिन्यापासून शासकीय आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्रावर भात पिकाची विक्री करावी लागते.

त्यामुळे खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर शेतकरी बांधवांना भात पिकाच्या विक्रीचे नगदी चुकारे अदा करणे ही संबंधित विभागाची नैतिक जबाबदारी आहे. परंतु पाच महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर देखील बऱ्याच शेतकरी बांधवांना भात पिकाचे चुकारे व बोनस अदा करण्यात आले नसल्याची दस्तुरखुद्द शेतकरी बांधवांची मोठी ओरड असून, संबंधित विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेच्या चक्रव्यूहात गुरफटून पडावे लागत आहे.

खरीप हंगामाची वेळ आली तरी भात पिकाचे चुकारे व बोनस अदा न करण्याचे कारण काय, चुकारे अदा न केल्यामुळे शेतकरी बांधवांना उसनवारी करून कर्जाची परतफेड करावी लागली आहे.

शेतकरी बांधवांना तूर्त दिलासा देण्याची तसदी घ्यावी, अशी मागणी भीम शक्ती संघटना जिल्हा भंडाराचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे, मनोज मेश्राम, बाळकृष्ण शेंडे, एस. के. वैद्य, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हरिदास बोरकर, अरुण ठवरे, उमाकांत काणेकर, विनाश खोब्रागडे, नितीश काणेकर, मच्छिंद्र टेंभुणे, संदीप बर्वे, सुरेश गेडाम, सुभाष शेंडे, सुधाकर चव्हाण, दामोधर उके, जयपाल रामटेके, नंदू वाघमारे आदींनी केली आहे.

Web Title: Pay grains and bonuses to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.