शेतकऱ्यांना धानाचे चुकारे व बोनस अदा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:37 AM2021-05-07T04:37:05+5:302021-05-07T04:37:05+5:30
भंडारा : जिल्हा पणन विभागाने वेळीच दखल घेवून भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी बांधवांचे धानाचे थकीत चुकारे तसेच बोनस ...
भंडारा : जिल्हा पणन विभागाने वेळीच दखल घेवून भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी बांधवांचे धानाचे थकीत चुकारे तसेच बोनस तात्काळ अदा करून तूर्त दिलासा देण्याची तसदी घ्यावी, अशी मागणी भीमशक्ती संघटनेने केली आहे.
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी खरीप हंगामात धान पिकांचे उत्पन्न घेत असतात. यासाठी शेतकरीबांधवांना बँका व सावकारी कर्ज काढून शेतीची मशागत आणि पीक लागवड करावी लागते. शेतात भातपिकाची लागवड झाल्यानंतर भात पिकाला लहान मुलाप्रमाणे जपावे लागते. परंतु, कधी वातावरणीय बदलामुळे, कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट कोसळत असतात. तर कधी वनस्पतीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने भात पिकांवर विपरीत परिणाम होत असल्याने पीक उत्पादनात बरीच घट येत असते. परंतु, शेतकरी बांधवांना कर्जाची परतफेड विहित कालावधीत करावी लागत असल्याने लवकर मळणी करून नोव्हेंबर महिन्यांपासून शासकीय आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्रावर भात पिकाची विक्री करावी लागते.
त्यामुळे खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर शेतकरीबांधवांना भात पिकाच्या विक्रीचे नगदी चुकारे अदा करणे, ही संबंधित विभागाची नैतिक जबाबदारी आहे. परंतु, पाच महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही बऱ्याच शेतकरीबांधवांना भात पिकाचे चुकारे व बोनस अदा करण्यात आले नसल्याची दस्तुरखुद्द शेतकऱ्यांतून मोठी ओरड होत असून संबंधित विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेच्या चक्रव्युहात गुरफटून पडावे लागत आहे.
खरीप हंगामाची वेळ आली तरी भात पिकाचे चुकारे व बोनस अदा न करण्याचे कारण काय, चुकारे अदा न केल्यामुळे शेतकरी बांधवांना उधार उसनवारी करून कर्जाची परतफेड करावी लागत आहे.
शेतकरी बांधवांना तूर्त दिलासा देण्याची तसदी घ्यावी, अशी मागणी भीमशक्ती संघटना जिल्हा भंडाराचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशपांडे, मनोज मेश्राम, बाळकृष्ण शेंडे, एस. के. वैद्य, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हरिदास बोरकर, अरुण ठवरे, उमाकांत काणेकर, विनाश खोब्रागडे नितीश काणेकर, मच्छिंद्र टेंभूणे, संदीप बर्वे, सुरेश गेडाम, सुभाष शेंडे, सुधाकर चव्हाण, दामोधर उके, जयपाल रामटेके, नंदू वाघमारे आदींनी केली आहे.