नळ पाईपलाईनचे खड्डे जीवघेणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 05:00 AM2020-06-09T05:00:00+5:302020-06-09T05:00:23+5:30
रस्त्यावर ठिकठिकाणी सहा ते सात ठिकाणी मोठमोठे खड्डे खोदून ठेवले आहेत. दहा दिवसांचा कालावधी लोटूनही नगर परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रस्त्यावरुन ये-जा करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकदा कर्मचाऱ्यांना विचारपूस केल्यानंतर तात्पूरती दुरुस्ती केली जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नळ दुरुस्तीच्या कामासाठी खोदकाम केलेले खड्डे बुजविले नसल्याने नागरिकांच्या जीवाला धोका वाढला आहे. गत आठ दिवसांपासून शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी वॉर्डातील काही नळधारकांच्या नळाला पाणी येत नसल्याने नगरपरिषदेकडून पाइपलाईनच्या दुरुस्तीसाठी खोदकाम करण्यात आले होते.
यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी सहा ते सात ठिकाणी मोठमोठे खड्डे खोदून ठेवले आहेत. दहा दिवसांचा कालावधी लोटूनही नगर परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रस्त्यावरुन ये-जा करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकदा कर्मचाऱ्यांना विचारपूस केल्यानंतर तात्पूरती दुरुस्ती केली जाते. मात्र यावर अद्यापही कायमस्वरुपी तोडगा न निघाल्याने येथे अपघात वाढले आहेत. परिसरात लहान मुले खेळत असताना या खड्यात पडून अनेकांना दुखापत झाली आहे. त्यामुळे जीव गेल्यावर नगर परिषद लक्ष देणार काय? असा संतप्त सवाल वॉर्डातील नागरिकांनी केला आहे.
वॉर्डात रस्त्यासह आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे शासकीय कार्यालयाचा परिसर असल्याने येथे नेहमीच वाहनाची वर्दळ असते. येथे नगरपरिषदेकडून कोणत्याच सुविधा वेळेवर मिळत नाहीत. परिसरातील नागरिक वेळेवर घरपट्टी, पाणीपट्टी भरुन देखील नागरिकांवर प्रशासनाकडून अन्याय होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिसरातील नाल्यांच्या साफसफाईसह वॉर्डातील पाणी प्रश्न सोडवून रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वॉर्डाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. गत काही वर्षांपासून त्या खड्यांची दुरुस्ती झालेली नाही. रस्ते काम अनेक वर्षापुर्वी झाल्याने येथील रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. जिल्ह्यातून विविध कामासाठी येणारे नागरिक या परिसरात विविध कार्यालयात येतात.
परिसरात विविध शासकीय कार्यालय असल्याने येथे नेहमीच गर्दी राहते. दुय्यम निबंधक कार्यालयासमोर अनेकदा अस्ताव्यस्त वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनधारकांना तासन्तास ताडकळत थांबावे लागते. कार्यालयातील कर्मचाऱ्यासंह कामानिमित्त येणारे नागरिक अस्ताव्यस्त वाहने लावतात. पोलिसांकडूनच कायद्याचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्यांना कोण कायद्या शिकविणार? असा प्रश्न निर्माण होत आहे. वॉर्डातील पाणी समस्येंसह खड्ड्याची दुरुस्ती त्वरित न केल्यास आंदोलनाचा इशारा वॉर्डातील विलास तिडके यांच्यासह सम्राट अशोक सेनेचे तुलसीराम गेडाम यांनी केला आहे.
फक्त पाहणी करुनच परत जातात कर्मचारी
भंडारा नगरपरिषदेतील पाणी पुरवठा विभागात असणारे जुने कर्मचारी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी काही कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र या कर्मचाºयांना पुरेशी माहिती नसल्याने अनेकदा नळ योजनेचा बिघाड झाल्यास अंदाज येत नाही. त्यामुळे या परिसरात नळ दुरुस्तीसाठी ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे खोदण्यात आले आहेत. येथून वाहने नेतांना वॉर्ड वासीयांची चांगली दमछाक होत आहे. यामध्ये अनेकदा खड्ड्यात पडून अपघात देखील झाला आहे. मात्र कर्मचारी दररोज नवीनच कारण सांगुन कामाची टाळाटाळ करीत आहे. याकडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
गेल्या दहा दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्याने पाण्यासाठी इतरत्र फिरावे लागत आहे. नळ दुरुस्तीसाठी वारंवार कर्मचाऱ्यांना सांगुनही टाळाटाळ होत आहे. दुरुस्ती त्वरित न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांना भेटून समस्या मांडणार आहे.
-विलास तिडके,
नागरिक तुकडोजी वॉर्ड, भंडारा