‘त्या’ जखमीजवळ पोलिसांचा पहारा
By admin | Published: July 10, 2015 01:11 AM2015-07-10T01:11:18+5:302015-07-10T01:11:18+5:30
तुमसर येथील सिलिंडर स्फोट प्रकरणी फॉरेन्सीक अहवालाची प्रतिक्षा असून प्रथमदर्शनी स्फोट सिलिंडरचा झाला की अन्य स्फोटक पदार्थ घरात होते,
प्रकरण तुमसरातील सिलिंडर स्फोटाचे : फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा
तुमसर : तुमसर येथील सिलिंडर स्फोट प्रकरणी फॉरेन्सीक अहवालाची प्रतिक्षा असून प्रथमदर्शनी स्फोट सिलिंडरचा झाला की अन्य स्फोटक पदार्थ घरात होते, याची चौकशी सुरू आहे. अत्यवस्थ राजेंद्र नागपुरे यांच्यावर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून तेथे पोलिसांचा खडा पहारा आहे.
दि.४ जुलैच्या रात्री ७.३० वाजता तुमसर येथील गांधी वॉर्डात राजेंद्र नागपुरे यांच्या घरी मोठा स्फोट झाला. या स्फोटात घराजवळील मुन्ना पिथोडे (५५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर राजेंद्र गंभीर जखमी झाला होता. स्फोटाचे हादरे दोन ते अडीच कि़मी. पर्यंत बसले होते. स्फोटात सिलिंडर बाहेर फेकला गेला. दोन खोल्यंची स्लॅब कोसळले होते. मुन्ना पिथोडे यांच्या अंगावर भींत पडून ते दाबले गेले. घरातील सामान सर्वत्र विखुरले गेले होते. किमान १५० ते २०० फूट अंतरावर भांडी फेकल्या गेली. सर्वत्र काचांचा खच पडला होता.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी नागपूर येथून फॉरेन्सीकचे पथक आले होते. प्रथमदर्शनी सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती प्राप्त झाली, परंतु सखोल चौकशी अंती स्फोटाच्या गंभीरतेमुळे हा स्फोट अन्य स्फोटक पदार्थामुळे तर झाला नाही याचा संशय व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती आहे.
नागपूर येथील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख जी. एम. रामटेके, एच.पी.सी.एल.चे सेल्स आॅफीसर विवेक सिंग यांनी घटनास्थळी भेटी दिल्या. गंभीर जखमी राजेंद्र नागपुरे यांच्यावर नागपूर येथे एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्या रुग्णालयात पोलिसांचा खडा पहारा आहे. या प्रकरणाची गंभीर दखल पोलीस विभागाने घेतल्याने दिसून येते. स्फोटकांचा व राजेंद्रचा काही संबंध आहे काय, स्फोटके कुठून व कां आणली असावी, पुरवठा कोणी केला, स्फोट नेमका कशामुळे झाला. सिलिंडरचा स्फोट झाला तर त्याची स्थिती काय, सिलिंडरचे तुकडे झाले नाहीत, सिलिंडरचा स्फोट झाल्यावर त्याची तिव्रता किती असते, याची संपूर्ण माहिती एचपीसीएल अधिकाऱ्यांकडून पोलीस विभाग घेत असल्याची माहिती आहे. शहरात या स्फोटाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. या प्रकरणात तुमसर पोलिस कमालीची गुप्तता पाळत आहे. (तालुका प्रतिनिधी)