पळून गेलेल्या २५४ अल्पवयीन मुलींना पोलिसांनी दाखविली घरची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:36 AM2021-07-28T04:36:51+5:302021-07-28T04:36:51+5:30
भंडारा : सोशल मीडियाचा प्रभाव आणि क्षणिक मोहात प्रेमपाशात अडकून घरुन पळून गेलेल्या मुलींसाठी पोलीस देवदूत ठरले. गत साडेतीन ...
भंडारा : सोशल मीडियाचा प्रभाव आणि क्षणिक मोहात प्रेमपाशात अडकून घरुन पळून गेलेल्या मुलींसाठी पोलीस देवदूत ठरले. गत साडेतीन वर्षात जिल्ह्यातील २५६ अल्पवयीन मुली घर सोडून पळून गेल्या होत्या. मात्र पोलिसांनी त्यांचा माग काढून घरचा रस्ता दाखविला. यावर्षी पळून गेलेल्या दोन मुलींचा शोध पोलीस घेत आहेत.
भंडारा जिल्ह्यात अलीकडे अल्पवयीन मुलींचे प्रेम प्रकरणातून पळून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. गत काही वर्षातील उदाहरणे बघितली तर क्षणिक मोहात पडून तरुणी आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना सोडून प्रियकरासोबत पळून गेल्याचे दिसून येते. मात्र आई-वडिलांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. २५६ तरुणींपैकी दोन अपवाद वगळता सर्व तरुणींना सुखरूप आपल्या आई-वडिलांच्या हवाली केले आहे.
उदाहरण १
ग्रामीण भागातून मुलगी शहरात शिकायला आली की तिला शहरी वातावरणाची भुरळ पडते. अशातच ती कोणताही विचार न करता कुणाच्या तरी प्रेमात पडते. भंडारा तालुक्यातील एका गावातील तरुणी अशीच एका तरुणाच्या प्रेमात पडली आणि शिक्षण सोडून पळून गेली. परंतु आपण अल्पवयीन असल्याने लग्न होऊ शकत नाही हे तिच्या लक्षात आले आणि पोलिसांच्या मदतीने घरी आली.
उदाहरण २
भंडारा शहरातील एका तरुणीचे फेसबुकच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील महागावच्या तरुणाशी प्रेम झाले. ती कुणालाही न सांगता थेट महागावात पोहचली. इकडे आई-वडिलांनी पोलिसात धाव घेतली. मोबाईल लोकेशनवरून तिचा शोध घेतला. मुलीला आणि तिच्या प्रियकराला भंडाऱ्यात आणले. मुलीला आई-वडिलांच्या हवाली करण्यात आले तर मुलावर गुन्हा नोंदवून त्याला कारागृहात डांबले.
मुला-मुलींचे चुकीचे पाऊल पडू नये म्हणून व्हा त्यांचे मित्र !
आपली मुलगी अथवा मुलगा नेमका कुठे जातो, त्याचे मित्र कोण आहेत, मोबाईलमधून कुणाशी चॅटिंग करतो याची वारंवार पालकांनी तपासणी करणे गरजेचे झाले आहे.
पालकांनी मुलांना स्वातंत्र्य देताना त्यांच्यावर नियंत्रणही ठेवणे गरजेचे झाले आहे. बाहेरगावी मुलगी शिकत असेल तर तिच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. परंतु सर्वच मुली अशा नसतात त्यामुळे पालकांनी मुलांशी मैत्री करावी.
अल्पवयीन मुली पळून गेल्याच्या घटना
२०१८ - ८४
२०१९ - ८०
२०२० - ६१
२०२१ - ३१