०१ लोक ०९ के
भंडारा : भंडारा ते पवनी महामार्ग चिखलात बुडाला असून, सिमेंटच्या रोडऐवजी जागोजागी रस्त्यांचे खोदकाम केल्यामुळे पक्क्या रोडवर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित रहदारी करण्यासाठी चिखलातून वाट शोधावी लागते. मात्र संपूर्ण रस्ता चिखलमय झाल्याने अनेक नागरिकांची तारांबळ होत असून लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असल्याचे चित्र आंबाडी ते गिरोला मार्गावर दिसत आहे.
रोडची कामे करताना एका बाजूचे काम करून दुसरी बाजू रहदारीकरिता सुरळीत करणे आवश्यक असते. मात्र झोपलेल्या प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे कंत्राटदारावर कोणाचाही अंकुश नसल्याने मनमर्जीप्रमाणे बांधकाम सुरू असून, चिखलाने माखलेला रस्ता दररोज अपघाताला आमंत्रण देत असून, एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार काय? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.
भंडारा-पवनी हा अत्यंत रहदारीची मार्ग असून मागील दोन ते अडीच वर्षांपासून या महामार्गावर सिमेंटच्या पक्क्या रस्त्याचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे. यात कंत्राटदाराच्या नियोजनशून्यतेमुळे जागोजागी रस्त्याचे खोदकाम करून ठेवले असल्याचा प्रकार लक्षात आला असून, आंबाडी ते गिरोला रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाल्याचे विदारक चित्र पाहायला मिळते आहे. पावसाळ्यापूर्वी सिमेंटचे पक्के रस्ते पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र पावसाळा सुरू झाला असतानाही कंत्राटदार व प्रशासन झोपेत आहे.
रस्त्याचे बांधकाम करताना एका बाजूने रहदारीसाठी रस्ता ठेवून दुसऱ्या बाजूचे बांधकाम करणे गरजेचे आहे. मात्र येथील कंत्राटदाराचे प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याशी आर्थिक साटेलोटे असल्याने अत्यंत वर्दळीचा महामार्ग असतानाही याकडे मुद्दाम डोळेझाक करीत असल्याची येथील नागरिकांची ओरड आहे.
मागील दीड वर्षापासून कोरोना महामारीने नागरिकांचे हाल झाले असून नुकतेच कोरोनाचे नियम शिथिल झाल्याने ग्रामीण भागातील मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात भंडारा शहराकडे कामाच्या शोधात येतो. मात्र रस्त्यावर पसरलेल्या चिखलाने वाहतूक करणाऱ्या नागरिकांच्या दुचाकी, तीनचाकी, सायकल आणि इतर छोटी वाहने चिखलात घसरून रोजच वाहतूक करणारे नागरिक चिखलात पडत आहेत.
बॉक्स
नागरिकांसाठी कर्दनकाळ
भंडारा-पवनी महामार्गावरील आंबाडी ते गिरोला तसेच इतरही ठिकाणी जागोजागी खोदलेला महामार्ग हा नागरिकांसाठी कर्दनकाळ ठरत असून, अपघाताला आमंत्रण देत आहे. नागरिकांचे जीव जाण्यापूर्वी प्रशासनाने जागे होऊन रस्त्यावरील चिखलाची विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.