तंत्रशुद्ध शेती शेतकऱ्यांना तारक आहे. पारंपरिक पद्धतीला नव्या तंत्राची जोड देणे अत्यावश्यक आहे.
भात शेती तंत्रशुद्ध पद्धतीने केल्यास खर्च कमी होऊन नफा निश्चितच मिळू शकतो,असे प्रतिपादन मंडळ कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर यांनी केले.
लाखनी तालुक्याच्या पालांदूर येथे महिला शेती शाळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच ताराचंद निरगुळे, कृषी पर्यवेक्षक मुकुंद खराबे, अशोक जीभकाटे, कृषी सहायक जागेश्वर नाकाडे, मनोहर बावनकुळे, योगेश गजभिये, विद्या गिरेपुंजे, प्रगतशील शेतकरी अनिल चुटे, कृषी मित्र लेकराम निरगुडे उपस्थित होते. पांडेगावकर म्हणाले, भात शेती करताना पेरणीपासून तर कापणीपर्यंतचे संपूर्ण व्यवस्थापन तंत्रशुद्ध पद्धतीने व्हायला हवे. दिवसेंदिवस शेतीमध्ये तांत्रिक सुधारणा होत आहे. शेतकऱ्यांनी पारंपारिक ज्ञानाला नव्या तंत्राची जोड देत आधुनिक शेती करावी. यात जमिनीची मशागत, खताच्या मात्रा, उत्कृष्ट बियाणे, बीजप्रक्रिया, गादीवाफे, किमान २१ दिवसात रोवणी, विशिष्ट अंतरावर लागवड, नत्र,स्फुरद, पालाश यांचे प्रमाण, किडीची ओळख, कीड नियंत्रण, फवारणी, फळबाग योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, यांत्रिकी योजना अशा विविध अंगाने शेतीला जोडणी केल्यास निश्चितच शेती नफ्याची व्हायला समस्या उरणार नाही. यावेळी महिलांनी शेती शाळेच्या अनुषंगाने सकारात्मक अनुभव विषद केले. कृषी विभागाने पुरविलेल्या योजना, अभ्यास महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. कविता बावनकुळे, स्वाती निरगुडे, सुषमा बावनकुळे, माधुरी रामटेके, प्रियंका बावनकुळे यांनी शेती शाळेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन कृषी सहायक नाकाडे ,प्रास्ताविक कृषी सहायक योगेश गजभिये यांनी केले. आभार कृषी पर्यवेक्षक अशोक जीभकाटे यांनी मानले.