लाखांदूर : गत काही महिन्यांपासून ग्रामपंचायत प्रशासनाकडून वीज बिलाचा भरणा न केल्यामुळे तालुक्यातील आठ पाणीपुरवठा योजनेची वीज खंडित झाला आहे. या योजनेचा वीज खंडित झाल्याने गावकऱ्यांत पाणीपुरवठ्याअभावी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
गत वर्षी कोरोनाच्या परिस्थितीमुळे शासनाकडून वीज बिल माफ होण्याचा अंदाज नागरिकांमध्ये व्यक्त केला जात होता. या अंदाजानुसार तालुक्यातील विविध संस्था व नागरिकांनी वीज बिलाचा भरणा न केल्याची देखील चर्चा आहे. यावेळी वीज बिल कंपनीद्वारा थकीत वीज बिल वसुली व वीज बिलाचा भरणा न करण्यावर वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे.
या मोहिमेंतर्गत गत अनेक महिन्यांपासून तालुक्यातील आठ ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल न भरल्यामुळे त्यांची वीज तोडण्यात आली आहे. तालुक्यातील मुर्झा, मानेगाव, धर्मापुरी, तई (बुज), खैरी, ढोलसर, भागडी व नांदेड आदी गावांतील पाणीपुरवठा योजनेची विद्युत खंडित करण्यात आला आहे. ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांद्वारा कराचा भरणा न केल्याने सदर वीज खंडितची समस्या उद्भवली असल्याची चर्चा केली जात आहे. याप्रकरणी शासन प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन तालुक्यातील पाणीपुरवठा योजना पूर्ववत होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांत केली जात आहे.
बॉक्स
बोअरवेल व विहिरीच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर
वीज बिलाचा भरणा न केल्याने तालुक्यातील आठ गावांतील पाणीपुरवठा योजनेची वीज तोडण्यात आली. यामुळे सदर गावांत पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. संबंधित गावात पिण्यासाठी बोअरवेल व विहिरीच्या पाण्याचा वापर होत असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे.