फोटो ०९ लोक०२,०३ के
भंडारा : तालुक्यातील शहापूर मंडलांतर्गत संगम पुनर्वसन मुजबी येथे महावितरण कंपनीच्या लहरीपणामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. मागील दोन महिन्यांपासून गावातील पथदिवे बंद आहेत. याबाबत महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क केला असता, कर्मचारी नेहमीच ‘नॉट रिचेबल’ असतात. कधी संपर्क झालाच तर दुसऱ्याही गावाची वीज खंडित आहे. तुमचे एकच गाव आहे का? वाट पहा! अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
भंडारा शहरालगत संगम पुनर्वसन हे गोसे प्रकल्पबाधित गाव आहे. येथील विद्युत यंत्रणा पूर्णतः खिळखिळी झाली असून, अनेक ठिकाणी विद्युत खांब वाकले असून, जिवंत तारा लोंबकळत आहेत, याशिवाय विद्युत रोहित्रही खुले असून, पूर्णतः फुटलेले आहे. त्यामुळे जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने विजेच्या ठिणग्या पडून गावातील वीजपुरवठा रोजच खंडित होत असून, ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
जनमित्राला संपर्क केल्यास ते नेहमीच ‘नॉट रिचेबल’ असतात. कधी-कधी थातुरमातूर जोड जंतर करतात. मात्र, वारंवार खंडित होणाऱ्या विजेचा कायमस्वरूपी बंदोबस्त केला जात नाही. मागील दोन महिन्यांपासून गावातील पथदिवे बंद असून, गावातील वीजपुरवठा सुरळीत करून फुटलेले रोहित्र तसेच लोंबकळलेल्या विद्युत तारा व वाकलेल्या खांबांची पुनर्बांधणी करून बंद असलेले पथदिवे सुरु करण्याबाबत कार्यालयात निवेदन दिले आहे. मात्र, या निवेदनाची कोणतीही दखल घेतली जात नसल्याची ओरड ग्रामस्थांमधून होत आहे. अशातच ८ मे रोजी ५.३०च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. संगम येथील अगोदरच खिळखिळी असलेली विद्युत यंत्रणा यामुळे कोसळली असून, जिवंत विद्युत तारा व विजेचे खांब जमिनीवर पडले आहेत. त्यामुळे गावातील वीजपुरवठा शनिवारपासून अद्यापपर्यंत बंद आहे. जनमित्रांशी संपर्क केला असता. नेहमीप्रमाणे ते ‘नॉट रिचेबल’ आहेत.
एकीकडे कोरोना महामारीने नागरिकांचे जगणे मुश्कील केले तर दुसरीकडे भरमसाठ येणाऱ्या विद्युत बिलाने लोकांचे कंबरडे मोडले आहे. अगोदरच हाताला काम नसल्याने अनेकांचे रोजगार गेले असून, हातावर पोट असणाऱ्यांचा दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशातच दोन महिन्यांपासून गावातील पथदिवे बंद असून, वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाणही वाढले आहे. संगम येथील ग्रामस्थ विजेच्या रोजच्या त्रासाला कंटाळले असून, जिवंत विद्युत तारा, वाकलेले खांब व फुटलेल्या रोहित्रामुळे गावात जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे.
प्रतिक्रिया:-
शनिवारी झालेल्या वादळी पावसाने मंडलामधील बहुतांश गावांमधील विद्युत तारा तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु आहे.
चापेकर, कनिष्ठ अभियंता, शहापूर मंडल.