एका वर्षात खाद्यतेलाची किंमत झाली दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:36 AM2021-05-10T04:36:00+5:302021-05-10T04:36:00+5:30
विशाल रणदिवे अडयाळ : एकीकडे नागरिक कोरोनाच्या संकटामुळे हतबल झाले, तर दुसरीकडे लॉकडाऊन आणि तिसरीकडे रोजच्या उपयोगात येणारे खाद्यतेल, ...
विशाल रणदिवे
अडयाळ : एकीकडे नागरिक कोरोनाच्या संकटामुळे हतबल झाले, तर दुसरीकडे लॉकडाऊन आणि तिसरीकडे रोजच्या उपयोगात येणारे खाद्यतेल, गॅस सिलिंडर, पेट्रोल, अशा अनेक वस्तूंच्या किमती मात्र गगनाला भिडल्या आहेत. यात सर्वसामान्य व्यक्ती मात्र नाहक होरपळून जात आहे. यामुळे सर्वसामान्य गृहिणी सुद्धा चिंता व्यक्त करताना दिसत आहेत. त्यातच सोयाबीन तेल की ज्याची किंमत गेल्या वर्षभरात दुप्पट होऊन आता तो १६५-१७० प्रति किलोच्या दराने आता विक्री होत आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या तेल व संसारोपयोगी वस्तूंच्या चढ्या दराने गृहिणी तथा सामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
गतवर्षी सोयाबीन तेलाची किंमत प्रतिकिलो ८० ते ९० च्या घरात होती. आता मात्र सरळ १७० वर गेली आहे आणि तशी विक्रीसुद्धा सुरू आहे. यामुळे फोडणी पाण्याची की तेलाची द्यायची, असेही बोलले जात आहे. अन्य खाद्यतेलाचे दर नेहमीच उच्चांकी असल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोक सोयाबीन तेलाला पसंती देतात. तेच आता अधिक महागल्याने घरखर्च कसा भागवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे हाताला काम नाही, तर दुसरीकडे ज्या भरवशावर कसा तरी संसाराचा गाडा चालतो तोही बंद आणि तिसरीकडे महागाई आणि याहीपेक्षा कोरोनाचे संकट
काय करायचे कळेनासे झाले
एकेकाळी ग्रामीण भागातील ग्रामस्थ जवस तेल वापरत. असत; परंतु आता शेतात जवस पीक त्या प्रमाणात शेतकरी घेत नाहीत आणि आधीसारख्या जवस तेलाच्या गिरण्यासुद्धा जिल्ह्यात बोटावर मोजता येतील एवढ्याच दिसतात. आधी शुद्ध तेल खायला मिळत होते; पण आज तसं काहीच मिळत नसल्याची खंत सुद्खा बरेच शेतकरी व सामान्य ग्रामस्थ व्यक्त करताना दिसत आहे. आता सोयाबीन तेल फिल्टर होऊन येत असल्याचे बोलले जात असले तरी कोणत्या ब्रॅण्डचे किती शुद्ध तेल येते यावरही विचार केला जात आहे. एकंदरीत महागाईचा भडका सामान्यांच्या आवाक्यात नाही हे स्पष्ट असले तरी शेवटी जगण्याची उमेद कोण सोडील आणि सोडणार तरी कशी ?