प्रचार तोफा थंडावल्या, खऱ्या प्रचाराला गावागावांत प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 05:00 AM2021-01-14T05:00:00+5:302021-01-14T05:00:27+5:30
जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल ११ डिसेंबर रोजी फुंकण्यात आला होता. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा करताच गावागावात उत्साह संचारला होता. जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित करण्यात आली. त्यात साकोली १८, मोहाडी १७, भंडारा ३५, पवनी २७, लाखनी २०, साकोली २० आणि लाखांदूर तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ४६१ प्रभागातून १,२३६ सदस्य निवडणूक द्यावयाचे आहेत. त्यासाठी २,७४५ उमेदवार रिंगणात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी ५ वाजता थंडावल्या आणि खऱ्या अर्थाने गावागावात प्रचाराला प्रारंभ झाला. कत्तल की रात म्हणून गुरुवारची रात्र ओळखली जाणार असून या रात्री केलेल्या नियोजनावरच विजयाचे गणित अवलंबून असते. मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले असून जिल्ह्यातील ४६८ केंद्रांवर १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळात मतदान होणार आहे. जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल ११ डिसेंबर रोजी फुंकण्यात आला होता. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा करताच गावागावात उत्साह संचारला होता. जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित करण्यात आली. त्यात साकोली १८, मोहाडी १७, भंडारा ३५, पवनी २७, लाखनी २०, साकोली २० आणि लाखांदूर तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ४६१ प्रभागातून १,२३६ सदस्य निवडणूक द्यावयाचे आहेत. त्यासाठी २,७४५ उमेदवार रिंगणात आहेत. तुमसर तालुक्यातील १६० जागांसाठी ३८६ उमेदवार, मोहाडी तालुक्यातील १४१ जागांसाठी ३४९ उमेदवार, भंडारा तालुक्यातील ३०५ जागांसाठी ६८५ उमेदवार, पवनी तालुक्यातील २१५ जागांसाठी ४४८ उमेदवार, लाखनी तालुक्यातील १५६ जागांसाठी ३२४ उमेदवार, साकोली तालुक्यातील १६० जागांसाठी २९४ उमेदवार आणि लाखांदूर तालुक्यातील ९० जागांसाठी २२३ उमेदवार रिंगणात आहेत.
गत ५ जानेवारीपासून प्रचाराला प्रारंभ झाला होता. गावागावांत या निवडणुकीने वातावरण चांगलेच तापले होते. बुधवार १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता या निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या. मात्र ग्रामीण भागात शेवटच्या रात्रीच खरा प्रचार केला जातो, असा आजवरचा अनुभव आहे. सर्व उमेदवार आणि त्यांचे पाठीराखे गुरुवारच्या रात्री विजयाचे गणित जुळविण्यात मग्न होणार आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने मतदानाची संपूर्ण तयारी केली आहे. जिल्ह्यातील ४६८ मतदार केंद्रांवर निवडणूक होणार आहे. त्यात तुमसर ५९, मोहाडी ५२, भंडारा १११, पवनी ८२, लाखनी ६८, साकोली ६१ आणि लाखांदूर तालुक्यात ३५ मतदार केंद्रांचा समावेश आहे. १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजतापासून मतदानाला प्रारंभ होणार असून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.
ग्रामपंचायत क्षेत्रात स्थानिक सुटी जाहीर
ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी शुक्रवार १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत क्षेत्रात मतदानासाठी सार्वजनिक सुटी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी जाहीर केली आहे. १५ जानेवारी हा कामकाजाचा दिवस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्ह्यातील सातही तालुक्यातील केवळ सार्वत्रिक निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयांना मतदानासाठी सुटी जाहीर केली आहे.
तीन दिवस मद्य विक्री बंद
जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे १४ जानेवारी मतदानपूर्वीचा दिवस, १५ जानेवारी मतदानाचा दिवस आणि १८ जानेवारी मतमोजणीचा दिवस या तीनही दिवशी मद्य विक्री बंद राहणार आहे. तीन दिवस सात तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.