अग्निशमन यंत्रणा खरेदीचा प्रस्तावच तीन महिने धूळखात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 02:32 AM2021-01-11T02:32:20+5:302021-01-11T02:32:51+5:30
दीड कोटींचे अंदाजपत्रक : जिल्हा शल्यचिकित्सकांची स्वाक्षरीच नव्हती
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हृदय पिळवटून टाकणाऱ्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अग्निकांडात दहा कोवळ्या जीवांचा करुण अंत केवळ प्रशासनाच्या हलगर्जीमुळेच झाल्याचे पुरावे लोकमतच्या हाती लागले आहेत. २५ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून कार्यरत असलेल्या या रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा खरेदी करण्याकडे जिल्हा शल्यचिकित्सक व सार्वजनिक बांधकाम विभागाने साफ दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. आग प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी दीड कोटी रुपयांच्या अंदाजपत्रक प्रस्तावावर जिल्हा शल्यचिकित्सक व सार्वजनिक बांधकाम विभागाची स्वाक्षरीच नसल्याचे लोकमतला आढळले आहे.
‘लोकमत’चा हाती लागलेल्या पत्रानुसार भंडारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. साधना तायडे यांना आग प्रतिबंधक उपाययोजनेच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र डॉ. तायडे तसेच डॉ. खंडाते यांनी त्याचा योग्यप्रकारे पाठपुरावा केला नाही.
‘या’ कार्यालयातून ‘त्या’ कार्यालयात प्रस्ताव
१५ सप्टेंबर २०२० रोजी पाठविण्यात आलेल्या या प्रस्तावात अग्निशमन यंत्रणा खरेदीसाठी १,५२,४४,७८३ रुपयांची मागणी करण्यात आली होती.
संचालक डॉ. तायडे यांनी प्रस्तावावर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी स्वाक्षरी करून व सार्वजनिक बांधकाम विभागाची तांत्रिक सहमती घेऊन तो आयुक्त कार्यालयात सादर करावा, जेणेकरुन पुढील कार्यवाही करणे सुलभ होईल असे पत्र, १३ नोव्हेंबर २०२० रोजी आरोग्य सेवा नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांना पाठविले.
या पत्राचा आधार घेऊन डॉ. जयस्वाल यांनी २० नोव्हेंबरला डॉ. खंडाते यांना अंदाजपत्रक त्रुटीची दुरुस्ती करून फेरसादर करण्याचा सूचना केल्या. परंतु नंतर हा प्रस्ताव आरोग्य सेवा संचालक कार्यालयात पोहोचलाच नाही.