लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. कृषीच्या माध्यमातून या देशाची अर्थव्यवस्था उभी राहू शकते. खरीप हंगामाच्या मुहूर्तावर पीक कजार्साठी नियमांचे पालन करून जिल्ह्यातील पात्र शेतकरी सभासदांना फास्टट्रॅक मोडवर कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले. पीक कर्ज वाटपासाठी महसूल, कृषी व बँक सखी असा टास्कफोर्स तयार करण्यात यावा, असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद सभागृहात शुक्रवारी विविध विषयाचा आढावा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, आमदार नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.खरीपासाठी पीक कर्ज वितरणाचा ४२६ कोटी २५ लाख रुपये एवढा लक्षांक जिल्ह्याला प्राप्त आहे. त्यापैकी ४८ हजार २४७ सभासदांना २३९ कोटी ६७ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले. पीक कर्ज ३० जूनपर्यंत वितरित करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक कर्ज वाटपाचा लाभ देण्यात आला. महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेत भंडारा जिल्ह्यात ३१ हजार ४२१ सभासदापैकी २२ हजार ४२८ तपासणी झाली आहे. २० हजार १३७ सभासदांना वितरित करण्यासाठी १०७ कोटी ४० लाख रुपये प्राप्त झाले असून ते खात्यावर जमा करण्यात आले आहेत.जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ३ हजार ८७ सभासदांकडून ३२ लाख १० हजार ८०२ क्विंटल धान खरेदी केली. रबी हंगामात ९५ केंद्रावर आजपर्यंत ६ हजार १७७ शेतकऱ्यांकडून २ लाख ४३ हजार ४४८ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. धान भरडाई बाबत या बैठकीत आढावा घेण्यात आला. जिल्ह्यामध्ये धानाचे सरासरी किती उत्पादन होते याचा अंदाज घेऊन धानाचे केंद्र वाढविण्याबाबत निर्णय घेतला जावा, असे ते म्हणाले. धान खरेदी केंद्र उभारण्यासाठी गोडाऊन उभारण्यासाठी वखार महामंडळाकडे पाठपुरावा करावा, असे त्यांनी सांगितले.प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत जिल्ह्यात वैयक्तिक खातेदार ७७ हजार ४३८ पात्र झाले. सामाईक खातेदारामध्ये १ लाख ३० हजार ३२६ खातेदार पात्र ठरले आहे. अपात्र खातेदारांची संख्या मोठी असून या योजनेच्या खातेदारांचा गावनिहाय फेर आढावा घेण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. ही प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण करावी, असे ते म्हणाले.खरीप हंगाम बी बियाणे खते वाटप संदर्भात या बैठकीत आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात पीक बदल पध्दतीचा प्रयोग राबविण्यात यावा, असे ते म्हणाले. रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खताचा वापर अधिक करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, असे केदार म्हणाले. जिल्ह्यातील पूर परिस्थिती संदर्भात आपत्ती व्यवस्थापन पूर्व तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुरामुळे वाहतूक खंडित होणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण व पूल निर्मितीचा आराखडा तयार करावा, असे पालकमंत्री म्हणाले. गावस्तरावर लसी, औषधे व धान्य, साधनसामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करण्यात यावा, असे ते म्हणाले. या बैठकीत विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.
शेतकऱ्यांना 'फास्टट्रॅक' मोडवर पीककर्ज उपलब्ध करून द्या; सुनील केदार यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 3:52 PM
खरीप हंगामाच्या मुहूर्तावर पीक कजार्साठी नियमांचे पालन करून जिल्ह्यातील पात्र शेतकरी सभासदांना फास्टट्रॅक मोडवर कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले.
ठळक मुद्दे ३० जूनपर्यंत पीक कर्ज वितरित करा