कामे निविदेपेक्षा कमी किमतीत : तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थित कामे, बंधाऱ्याची कामे निकृष्ट दर्जाचीमोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जलयुक्त शिवारांतर्गत देव्हाडी शिवारात कृषी विभागाने कृषी बंधारा तथा नाला खोलीकरणाची कामे सुरु आहेत. सिमेंट बंधाऱ्याची कामे तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थित सुरु असून बंधाऱ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नाला खोलीकरणानंतर माती पाळीवर घालण्यात आली असून पावसाळ्यात पाणी नाल्यात निश्चित जाणार आहे. येथील सर्वच कामे शासकीय दरापेक्षा कमी किंमतीत घेण्यात आली. मूळ कंत्राटदाराने इतर दोन कंत्राटदारांना ही कामे दिली आहे. ही सर्व कामे निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार करण्यात आली आहे.सिहोरा मंडळ अंतर्गत देव्हाडी शिवारात सुकळी रस्त्याजवळ कृषी विभागाने ९ लक्ष ५० हजारांचा सिमेंट कृषी बंधाऱ्याचे सध्या काम सुरु आहे. या बंधाऱ्याची शासकीय दराने मुळ किंमतीपेक्षा १५.२१ टक्के कमी दराने काम घेण्यात आले. यात मुळ कंत्राटदाराने दुसऱ्याला व नंतर दुसऱ्याने तिसऱ्या कंत्राटदाराला बंधारा बांधण्याचे काम दिले आहे. कृषी विभागाकडे तांत्रिक कर्मचारी उपलब्ध नाही.देव्हाडी शिवारात कृषी विभागातर्फे नाला खोलीकरणाची कामे करण्यात आली यात ३०० मीटर नाला खोलीकरणाचा समावेश आहे. गटक्रमांक १/२ मध्ये ४२० मीटर नाला खोलीकरण करण्यात आली. प्रत्यक्षात येथे १०० मीटर जास्तीचे काम करण्यात आले अशी माहिती कृषी समन्वयक डी. डी. वढीवे यांनी दिली. येथे अंदाजपत्रक किंमत २ लक्ष ४० हजार इतकी आहे. हे कामही कमी दराने करण्यात आले. १९.७५ टक्के कमी दराने ही कामे झाली आहेत. गटक्रमांक १/१ मध्ये १८० मीटर नाला खोलीकरण करण्यात आले. यात २ लक्ष ८२ हजार अंदाजपत्रक किंमत असून हे कामही कमी किंमतीत १९.७५ टक्के दराने करण्यात आले. गट क्रमांक १/३ मध्ये ३०० मीटर नाला खोलीकरण करण्यात आला. यात अंदाजपत्रकीय किंमत २ लक्ष ६० हजार आहे. १९.७५ टक्के कमी दराने ही कामे करण्यात आली. नाला खोलीकरणाची माती नाल्याच्या पाळीवर घालण्यात आली. पावसाच्या पाण्यात ही माती नाल्यात जाऊन नाला बुजण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिहोरा मंडळ हा ब्रिटीशकालीन काळापासून असून सिहोरा ते देव्हाडी हे किंमान अंतर १५ किमी चे आहे. अंदाजपत्रकीय किंमतीपेक्षा कमी किंमतीत कामे केल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होतो. कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप जि.प. सदस्य के. के. पंचबुद्धे यांनी केला आहे.
नाला खोलीकरणाच्या कामावर प्रश्नचिन्ह!
By admin | Published: June 23, 2017 12:19 AM