जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान खरेदी बारदानाअभावी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:40 AM2021-07-14T04:40:25+5:302021-07-14T04:40:25+5:30

भंडारा : गुदामांचा अभाव आणि विविध कारणाने उशिरा सुरू झालेली रब्बी हंगामातील धान खरेदी आता शेवटच्या टप्प्यात बारदानात अडकली ...

Rabi season paddy procurement in the district stalled due to lack of bags | जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान खरेदी बारदानाअभावी ठप्प

जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान खरेदी बारदानाअभावी ठप्प

googlenewsNext

भंडारा : गुदामांचा अभाव आणि विविध कारणाने उशिरा सुरू झालेली रब्बी हंगामातील धान खरेदी आता शेवटच्या टप्प्यात बारदानात अडकली आहे. पुरेशा बारदानाचा पुरवठा झाला नसल्याने जिल्ह्यातील बहुतांश केंद्रांवरील धान खरेदी आता ठप्प झाली आहे. विशेष म्हणजे आधारभूत किमतीत धान खरेदीची १५ जुलै ही अंतिम तारीख आहे. या दोन दिवसात धान खरेदी कशी होणार, असा प्रश्न आहे. दुसरीकडे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या धानावर व्यापाऱ्यांची नजर आहे.

भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामापासून धान खरेदीचा गुंता आहे. खरीप हंगामात पणन महासंघाने खरेदी केलेल्या धानाला ठेवण्यासाठी जागाच नव्हती. त्यामुळे उघड्यावर धान ठेवावे लागले. त्यातच मिलर्सनी भरडाईचा मुद्दा उपस्थित केला. दरवाढीसाठी भरडाईला धानच उचलला नाही. परिणामी गुदाम हाउसफुल्ल झाले. उघड्यावर धान खरेदी करण्यात आली. खरीप हंगामातील धान खरेदीच्या गुंत्याचा थेट परिणाम रब्बी हंगामातील खरेदीवर झाला. दरवर्षी १ मेपासून सुरू होणारी धान खरेदी १९ मेपासून सुरू झाली. त्यानंतरही अनंत अडचणींचा सामना करावा लागला. गुदामांचा मुख्य प्रश्न रब्बी हंगामात खरेदी केलेला धान साठविण्यासाठी निर्माण झाला. शेवटी बंद असलेल्या शाळा गुदाम म्हणून वापरास परवानगी मिळाली. रब्बी हंगामात जिल्ह्यात १३८ आधारभूत खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली. त्यापैकी १३३ खरेदी केंद्रांचे उद्घाटन झाले. प्रत्यक्षात १२९ केंद्र सुरू झाले. परंतु शेतकऱ्यांच्या समस्या येथे संपल्या नाहीत. बारदानाचा प्रश्न ऐरणीवर आला.

पणन महासंघाने ४० लाख बारदानांची मागणी नोंदविली. मात्र जिल्ह्यासाठी केवळ दहा लाख नग बारदान पुरविण्यात आले. ते अपुरे पडू लागले. परिणामी गत आठ दिवसांपासून बारदानाअभावी जिल्ह्यातील धानखरेदी ठप्प झाली आहे.

३० जून ही धान खरेदीची अंतिम तारीख होती. मात्र शेतकऱ्यांचा धान खरेदी न झाल्याने मुदतवाढ देण्यात आली. केंद्र सरकारने एक महिन्याची मुदतवाढ दिली असली तरी राज्य सरकारने मात्र १५ जुलैपर्यंतच धान खरेदीची परवानगी दिली. एकीकडे बारदान नाही आणि दुसरीकडे शेतकरी धान घेऊन येत आहेत. त्यामुळे धान खरेदीचा प्रश्न गुंतागुंतीचा झाला. आता तर गत आठ दिवसांपासून धान खरेदीच बंद झाली आहे. पणन महासंघाने धानाची खरेदी केली नाही तर अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आपला धान व्यापाऱ्यांना विकावा लागणार आहे. आधारभूत किमतीनुसार शेतकऱ्यांना १८६८ रुपये प्रतिक्विंटल भाव दिला जातो. परंतु व्यापारी शेतकऱ्यांकडून १३५० ते १४०० रुपये प्रतिक्विंटलने धानाची खरेदी करीत आहेत. खरीप हंगामाच्या लागवडीसाठी अडचणीत आलेला शेतकरी आता व्यापाऱ्यांना धान विकत आहे.

मिलर्सकडे लाखोंच्या संख्येने बारदान

शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला धान अधिकृत बारदानात भरला जातो. त्यानंतर मिलर्स त्यातून धान भरडाईसाठी घेऊन जातात. भरडाई झालेला तांदूळ त्या बारदानांमध्ये भरला जातो. धानापासून तांदूळ कमी प्रमाणात येतात. त्यामुळे अनेक नग बारदान मिलर्सकडे शिल्लक राहतात. जिल्ह्यातील बहुतांश मिलर्सकडे असे बारदान शिल्लक आहेत. एकीकडे बारदानाअभावी धान खरेदी ठप्प, तर दुसरीकडे मिलर्सकडे बारदान पडून आहे. चांगल्या प्रतीचा बारदाना मिलर्सकडून घेऊन त्यात धानाची मोजणी केल्यास ही समस्या सुटू शकते. परंतु कुणीही याकडे लक्ष द्यायला तयार नाही.

वनशूज बारदान मिलर्सकडे मुबलक प्रमाणात आहे. शासनाने तो बारदाना रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी उपयोगात आणल्यास समस्या निकाली निघू शकते. चांगल्या दर्जाचा बारदाना मिलर्सकडून घेतल्यास शासनाची आर्थिक बचतही होऊ शकते.

-भरत खंडाईत, संचालक, लोकमान्य राइल मिल, कवलेवाडा

शेकडो क्विंटल धान शेतकऱ्यांच्या घरात

रब्बी हंगामात शेतकऱ्यांना धानाचे चांगले उत्पन्न झाले. आतापर्यंत पणन महासंघाने साधारणत: दहा लाख क्विंटल धानाची खरेदी केली आहे. अद्यापही शेतकऱ्यांच्या घरी चार लाख क्विंटल धान असल्याची शक्यता आहे. शेतकरी आधारभूत केंद्रावर चौकशी करतात; मात्र बारदाना नसल्याचे कारण पुढे करून शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जात नाही.

शेतकऱ्यांच्या पोत्यातच धान खरेदी करा

बारदानाअभावी धान खरेदी ठप्प झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पोत्यातच धान खरेदी करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. परंतु याला अद्यापही मान्यता दिलेली नाही. संस्थांनी शेतकऱ्यांच्या पोत्यात धानाची मोजणी करावी, धान खरेदी करावा. बारदाना उपलब्ध होईल व त्यात शेतकऱ्यांचे पोते रिकामे करावे, असा पर्यायही शेतकऱ्यांनी सुचविला आहे.

खरीप हंगामात खरेदी केलेला धान पावसाळ्यापर्यंत उघड्यावरच होता. पणन महासंघ आणि संस्थांनी ताडपत्रीने झाकण्याचा प्रयत्न केला. परंतु बहुतांश ठिकाणी धान पोते ओले झाले. पोत्यातील धानाला अंकुर फुटले. हा धान कोणत्याही कामी येत नाही. यामुळे शासनाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे आगामी काळात असा प्रकार टाळायचा असेल तर पुरेशा गुदामांची निर्मिती करणे गरजेचे आहे.

Web Title: Rabi season paddy procurement in the district stalled due to lack of bags

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.