तुमसर : महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. निकालाच्या सुरवातीला महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये टफ फाईट पाहायला मिळाली. पण काही तासांनीच महायुतीने बहुमताचा आकडा गाठत २२० पेक्षा जास्त जागांसह तिहेरी आकड्याने सत्तेत येण्याचे यश गाठले आहे.
भंडारा जिल्ह्यात सुद्धा महायुतीचेच पारडे जड झालेलं दिसत आहे. तुमसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजू कारेमोरे यांचा ६४४०७ मतांनी विजय झाला आहे. त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चरण वाघमारे आणि प्रहारचे उमेदवार सेवक वाघाये निवडणूक रिंगणात उभे होते. विधानसभेत अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्या लढतींकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होत. महाराष्ट्राच्या निवडणुकीत काका विरुद्ध पुतण्याच्या लढतीत पुतण्याने बाजी मारत विदर्भातील सात पैकी सहा जागा जिंकण्याचा विक्रम केला आहे.
निकालाची सुरवात होताच पहिल्या फेरीपासूनच महायुतीचे राजू कारेमोरे ७०३८ मतांनी आघाडीवर होते. त्यांना शेवटपर्यंत आघाडी टिकून ठेवणे शक्य झाले आणि आता ते तुमसर मतदार संघातील लोकांच्या कौलानुसार त्यांचे प्रतिनिधि बनून विधानसभेत जाण्यास सज्ज झाले आहेत.