हक्काच्या पगारासाठी रामटेके बसले उपोषणावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:33 AM2021-04-15T04:33:56+5:302021-04-15T04:33:56+5:30
सालेकसा : कोरोना योद्धा म्हणून डॉक्टरांचा एकीकडे सन्मान केला जात असताना दुसरीकडे सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय ...
सालेकसा : कोरोना योद्धा म्हणून डॉक्टरांचा एकीकडे सन्मान केला जात असताना दुसरीकडे सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. एस. रामटेके यांना हक्काच्या पगारासाठी उपोषण करण्याची वेळ आली आहे.
प्रकरण असे की, डॉ. रामटेके ३ मार्च रोजी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे किरकोळ रजेचा अर्ज देऊन आपल्या मुलाच्या औषधोपचारासाठी मुलाला घेऊन नागपूर गेले होते; मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र क्रमांक नै.आव्य/कोरोना/कावि-२०८-२०२१ दिनांक ८ मार्च रोजी काढून फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन महिन्यांचा पगार थांबविण्याचे आदेश काढले आहे. त्यामुळे ते मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोना काळात घरचा आणि मुलाच्या औषधोपचारांचा खर्च कसा भागवावा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. डॉ. रामटेके यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार विनंती केल्यावरसुद्धा पगार मिळाला नसल्यामुळे त्यांनी सोमवारी (दि.१२) जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, कोषागार अधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना देऊन थकीत पगार मिळाला नाही तर मंगळवारपासून (दि.१३) पासून बेमुदत उपोषणावर बसणार असल्याची माहिती दिली होती. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीकडे लक्ष दिले नसल्यामुळे मंगळवारपासून (दि.१३) डॉ. रामटेके उपोषणावर बसले आहेत. उल्लेखनीय असे की, सध्याच्या परिस्थितीत सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात फक्त एकच म्हणजे डॉ. रामटेके हेच कार्यरत आहेत. आता ते सुद्धा उपोषणावर बसले असल्याने ग्रामीण रुग्णालय डॉक्टरविहीन झाले आहे. कोरोना संसर्ग काळात रात्रंदिवस सेवा देणाऱ्या डॉक्टरांना वेळेवर पगार मिळत नसेल तर त्यांनी उपाशी राहून रुग्णांची सेवा करावी का? असा प्रश्न गावकरी करीत आहेत. जिल्ह्यात व तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गेल्या सहा दिवसांपासून दररोज कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक भागांमध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशात डॉक्टरांची मन:स्थिती चांगली असणे गरजेचे आहे. पगारापासून वंचित असलेल्या डॉ. रामटेके यांचा त्वरित पगार काढण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
आमदारांच्या मध्यस्थीनंतर उपोषणाची सांगता
डॉ. रामटेके ग्रामीण रुग्णालयासमोर उपोषणाला बसले आहेत. याबाबत माहिती मिळताच आमदार सहसराम कोरोटे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासोबत चर्चा करून त्यांचे या प्रकरणाचे निराकरण केले, तसेच डॉ. रामटेके यांना लिंबू पाणी पाजून बेमुदत उपोषणाची सांगता केली. याप्रसंगी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष वासुदेव चुटे, ठाणेदार प्रमोद बघेले, नायब तहसीलदार व ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.