मोहन भोयर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : एरवी मार्च महिन्यात मायदेशी परतणारे युरोपातील दुर्मिळ पाणीपक्ष्यांचा यंदा पहिल्यांदाच मुक्कम वाढला असून मे महिनासंपत आला तरी तुमसर तालुक्यातील आसलपाणी तलावावर या पक्षांचा किलबिलाट ऐकू येत आहे. पक्षांचा मुक्कम वाढल्याने पक्षी प्रेमी सुखावले असून निरिक्षणासाठी गर्दी होत आहे. थंड प्रदेशातील पक्षी परत का गेले नाहीत हा संशोधनाचा विषय आहे.
तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील जंगल अतिशय घनदाट आहे. राखीव जंगलात त्याचा समावेश होतो. या तलाव परिसरात मानवी अधिवास कमी आहे. जंगल जैवविविधतेने नटलेले आहे. तलावात सध्या मुबलक पाणीसाठा आहे. हिवाळा सुरू होताच युरोप खंडातून तुमसर तालुक्यातील विविध पाणवठे व जंगल परिसरातील तलावावर वास्तव्याला येतात. आसलपाणी येथील तलावात बदक, कमळ पक्षी, काी पानकोंबडी, पिंकटेल डवस, लिटिल ग्रेप्स, कॉटन पिग्मी, विसलिंग डवस, प्ले हेरोन, पर्पल हेरोन, कॉमन कॉट, वॉटर कॉक, लिटल ग्रेब, फिडांत जकाना, पिट्टा, एशियन पॅराडाईज, फ्लाय कॅचर इत्यादी पक्षी येथे वास्तव्याला आहेत. तलावाच्या चारही बाजूला गवत, खुरटी झुडपे व इतर वनस्पती आहे. तलावात कमळ, पानलिली इत्यादी वनस्पती आहेत. तलावाततील पाणी शुद्ध आहे. पक्षांचे खाद्य येथे असल्याने स्थलांतरित पाहुण्या पक्षांनी येथे मुक्काम वाढविला आहे.
पक्षी अभ्यासकांना संधी
आसलपाणी येथील तलावावर विविध प्रकारचे स्थानिक व युरोप खंडातील पक्षांचे थवे येथे दिसतात. हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी या निवांत तलावावर मुक्कामी आहेत. त्यामुळे पर्यावरण प्रेमी व पक्षी अभ्यासकांना येथे संधी प्राप्त झाली आहे. वनविभागाच्या अथक परिश्रमामुळे या परिसरात जैवविविधता जोपासली गेली असल्याने या पक्ष्यांचे वास्तव्य या भागात आहे. असेच प्रयत्न पण विभागाकडून होत राहिल्यास या परिसरात पक्ष्यांचे नंदनवन होण्यास हातभार लागेल यात तिळमात्र शंका नाही.
आसलपाणी तलाव परिसरात मानवाचा हस्तक्षेप नसून वातावरण अतिशय आल्हाददायक आहे. त्यामुळे युरोप खंडातील थंड वातावरणातील पक्षी येथे भर उन्हाळ्यात वास्तव्याला आहेत. मार्च महिन्यात दरवर्षी हे पक्षी येथून मायदेशी परत जातात. परंतु या वर्षी मे महिन्याच्या शेवटपर्यंत ते वास्तव्याला आहेत. त्यामुळे येथील वातावरण युरोप खंडासारखे असल्याचे जाणवत आहे.
नितेश धनविजय, वनपरिक्षेत्राधिकारी, नाकाडोंगरी ता. तुमसर