इंद्रपाल कटकवार
भंडारा : शासन दारिद्र्य रेषेखालील, अंत्योदय व केशरी कार्डधारकांना अन्न पुरवठा करते. महिन्याकाठी मिळणारे रेशन आता काही लाभार्थी विक्री करीत असतात. काही लाभार्थी तांदूळ तर काही लोक गहू विक्री करीत असतात. जिल्ह्यात भात खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पोळीशिवाय राहणारे लाेक तांदळाचा वापर करून रेशनचे मिळणारे दोन रुपये किलोचे गहू शेजाऱ्या-पाजाऱ्यांना ८ ते १० रुपये किलोने विक्री करतात. शासनाने रेशनमध्ये प्रतिव्यक्ती असा रेशनचा कोटा ठरविल्यामुळे जे लोक तांदळाचा वापर करताना त्यांना रेशन दुकानातून मिळणारे रेशन हे त्यांच्या तुलनेत कमी असते; परंतु गहू मिळत असल्याने गव्हाचा वापर करीत नाहीत. गव्हाच्या ठिकाणी ते तांदळाचाच वापर करतात. त्यामुळे रेशन दुकानातून मिळालेले २ रुपये किलोचे गहू ८ ते १० रुपये किलोने खुल्या बाजारातही विकल्या जातात. याशिवाय ओळखीच्या व्यक्तींनाही त्याची विक्री केली जाते. काही लोक गव्हाचा वापर करतात; परंतु ते तांदूळ दुसऱ्या लोकांना विक्री करतात. तांदूळ १० रुपये किलोने विकून मिळालेल्या पैशातून गहू खरेदी करतात.
बॉक्स
३ रुपये किलो तांदूळ
अंत्योदय योजनेचा लाभ घेणाऱ्या कार्डधारकांना महिन्याकाठी ३५ किलो रेशन मिळते. २५ किलो तांदूळ व १० किलो गहू मिळत असते. तांदूळ तीन रुपये तर गहू दोन रुपये किलोने रेशन दुकानातून मिळत असतात.
बॉक्स
कारवाई करावी तरी कशी
अंत्योदय आणि प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत मोफत धान्याचे वाटप केले जाते. लाभार्थ्यांना धान्य वाटप केल्यानंतर त्याचे ते काय करतात हे कुणालाही सांगता येत नाही. स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना धान्याचे बरोबर वितरण होते किवा नाही याची चाचपणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून केली जात असते. मात्र तक्रार असल्याशिवाय कुणीही कारवाई करू शकत नाही. तसेच रेशनचे धान्य बाहेर लाभार्थी विक्री करीत असल्यासंदर्भात जिल्हा पुरवठा विभागाला तक्रारही प्राप्त होत नाही. ऐनकेन प्रकरणीच पुरवठा विभाग तक्रारीनंतर कारवाई करीत असतात. यामुळेच रेशनचे धान्य खुल्या बाजारात विकण्याच्या प्रमाणावर अंकुश लागलेला नाही.
बॉक्स
अशी आहे महसूल तालुक्यांची स्थिती
तुमसर : तुमसर शहरासह ग्रामीण भागातील लोकांना मिळणारे रेशन लाभार्थी संपूर्ण न वापरता काही धान्य दुसऱ्यांना अधिक किमतीत विक्री करतात. त्यामुळे खरे लाभार्थी त्यापासून वंचित राहत आहेत.
भंडारा : भंडारा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना हे अंत्योदय योजनेचा लाभ मिळत असल्याने ते शेतातील अन्न वापरतात आणि अंत्योदय योजनेचे रेशन दुसऱ्यांना कमी किमतीत विक्री करीत असतात.
साकोली : साकोली तालुक्यात सर्वाधिक वापर तांदळाचा होत असल्याचे दिसून येते. गव्हाचा वापर कमी प्रमणात होत असल्याने मिळणारे गहू हे अधिक किमतीत गव्हाची मागणी करणाऱ्यांना विकले जातात.