लाखांदूर तालुक्यातील मांढळ येथे गत काही वर्षांपूर्वीपासून प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आहे. या योजनेंतर्गत मांढळ येथील जलशुद्धीकरण केंद्र व पाणी टाकीतून स्थानिक मांढळ गावासह परिसरातील अन्य चार गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. या गावांत ओपारा, ढोलसर, गुंजेपार व किन्ही आदी गावांचा समावेश आहे. प्रादेशिक पाणीपुरवठा विभागांतर्गत कार्यान्वित सदर योजना सन २०१७ मध्ये लाभ क्षेत्रातील पाच गावांतर्गत स्थापित शिखर समितीकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुसार सदर समिती या योजनेच्या करवसुली, वीजबिल भरणा व अन्य देखभाल दुरुस्ती कामे सांभाळत असल्याची माहिती आहे. सदर समिती अंतर्गत गत काही महिन्यांपासून या योजनेच्या वीजबिलाचा भरणा न केल्याने सदर योजनेचा वीज कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केला आहे. सदर पुरवठा दोन दिवसांपूर्वी खंडित करण्यात आल्याने या योजनेच्या लाभक्षेत्रातील पाचही गावांतील पाणीपुरवठा बंद पडला आहे. सदर पाणीपुरवठा बंद पडल्याने या परिसरातील नागरिकांना पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याची ओरड आहे.. काही गावांतील नागरिक गावातीलच सार्वजनिक बोअरवेल, खासगी व कृषी सिंचन विहीर अथवा नदीच्या पाण्याचा वापर करीत असताना संबंधित पाणी पिण्या अयोग्य असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. शिखर समितीने दुर्लक्ष केल्यानेच या योजनेचा विद्युत पुरवठा खंडित झाला असून पाच गावांचा पाणीपुरवठा बंद पडल्याचा आरोप जनतेत केला जात आहे. या प्रकरणी शासन-प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन वीजबिलाचा भरणा न झाल्याने खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा जोडणीसह पाच गावांचा बंद पडलेला पाणीपुरवठा नियमित होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी या योजनेच्या लाभक्षेत्रातील जनतेने केली आहे.
प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची वीज खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 4:31 AM