एनएमएमएसच्या परीक्षेला २७६८ विद्यार्थ्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:54 AM2021-01-08T05:54:26+5:302021-01-08T05:54:26+5:30
राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधून, त्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्यासाठी आर्थिक साहाय्य करावे. त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक ...
राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधून, त्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्यासाठी आर्थिक साहाय्य करावे. त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी, यासाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असते. दीड लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलांनाच या परीक्षेला बसता येते. वर्षातून एकदाच ही परीक्षा घेण्यात येत असते. बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपात ही परीक्षा होणार आहे. बौद्धिक क्षमता चाचणीचा पहिला पेपर होणार असून, यात एकूण ९० प्रश्न आणि ९० गुण असतील. शालेय क्षमता चाचणीचा दुसरा पेपर होणार असून, यातही ९० प्रश्न आणि ९० गुण राहणार आहेत. एका पेपरसाठी दीड तासाचा वेळ देण्यात येणार आहे. या परीक्षेत किमान ४० टक्के गुण मिळविणारा विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण ठरणाऱ्या विद्यार्थ्याला बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत दरमहा एक हजार रुपयाप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते.
या परीक्षेसाठी जिल्ह्यातील १९६ शाळामधून २ हजार ७६८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. यात सर्वाधिक ५०४ अर्ज पवनी तालुक्यातील आहेत. सर्वात कमी २६५ अर्ज लाखनी तालुक्यातून भरण्यात आले आहेत. त्या खालोखाल तुमसर -४८८ ,साकोली -४४५,भंडारा -४४१, लाखांदूर - ३३५ , मोहाडी -२९० असे एनएमएमएसच्या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज शाळांनी दाखल केले आहेत. मोहाडी तालुक्यातून सर्वाधिक महात्मा ज्योतीबा फुले हायस्कूल मोहगाव देवी या शाळेने ३८ अर्ज, भंडारा तालुक्यातील सर्वाधिक अर्ज नानाजी जोशी हायस्कूल शहापूर -७६ ,पवनी तालुक्यातील सर्वाधिक अर्ज गांधी विद्यालय कोंढा -७६ ,तुमसर तालुक्यातील सर्वाधिक अर्ज आदर्श विद्यालय सिहोरा - ५१ ,लाखांदूर तालुक्यातील सर्वाधिक अर्ज जिल्हा परिषद हायस्कूल लाखांदूर -६१, साकोली तालुक्यातील सर्वाधिक अर्ज जिल्हा परिषद हायस्कूल साकोली -८० तर लाखनी तालुक्यातील सर्वाधिक अर्ज समर्थ विद्यालय लाखनी या शाळेने ३२ अर्ज दाखल केले आहेत.
एनएमएमएस परीक्षेच्या आवेदन पत्र भरण्याच्या तारखेत १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना परीक्षेला प्रविष्ट होण्यास मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रोत्साहित करावे.
- संजय डोर्लीकर
शिक्षणाधिकारी(माध्यमिक), जिल्हा परिषद भंडारा