सामान्य रुग्णालय ते ग्रामसेवक कॉलनी रस्त्याचे नूतनीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:31 AM2021-07-26T04:31:42+5:302021-07-26T04:31:42+5:30
भंडारा शहर काँग्रेस कमिटीची मागणी भंडारा : शहरातील सामान्य रुग्णालयासमोरील रस्ता, ग्रामसेवक कॉलनी ते लहान पुलापर्यंतच्या रस्त्याचे नूतनीकरण करा, ...
भंडारा शहर काँग्रेस कमिटीची मागणी
भंडारा : शहरातील सामान्य रुग्णालयासमोरील रस्ता, ग्रामसेवक कॉलनी ते लहान पुलापर्यंतच्या रस्त्याचे नूतनीकरण करा, अशी मागणी भंडारा शहर काँग्रेस कमिटीने निवेदनातून केली आहे. या आशयाचे निवेदन पालिका मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
हा रस्ता कारधा ते ग्रामीण भागाला जोडणारा आहे. या मार्गाने ग्रामीण भागातील जनता मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असते. त्याचप्रमाणे याच मार्गाने रुग्णवाहिकांची वर्दळ असते. याच परिसरात एसटी डेपो, अन्नधान्याचे शासकीय गोडावून असून या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाहनांचे आवागमन होत असते; परंतु बऱ्याच वर्षांपासून हा रस्ता उखडलेला असून सुद्धा नगर परिषदेचे या रस्त्याकडे दुर्लक्ष आहे. हा रस्ता मुख्य मार्गाप्रमाणेच असून सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहे. तर या रस्त्यावर दुचाकी वाहन चालवणे कठीण झाले आहे. यासंदर्भात भंडारा शहर काँग्रेस कमिटीतर्फे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदनाव्दारे रस्ता नूतनीकरणाची मागणी करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे याच मार्गावरुन स्मशान घाटाचा मार्ग आहे. मनुष्याच्या आयुष्याचा शेवटचा प्रवासही खडतर आहे, असे या मार्गाने मोक्षरथ जाताना लक्षात येेते. परिणामी या रस्त्याचे नूतनीकरण होणे अपेक्षित आहे. निवेदन देताना भंडारा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत देशकर, इंटकचे जिल्हा अध्यक्ष धनराज साठवणे, इंटकचे जिल्हा महासचिव महेंद्र वाहाणे, शहर महासचिव मेहमूद खान, महासचिव इम्रान पटेल, इंटकचे उपाध्यक्ष जीवन भजनकर, रवींद्र थानथराटे, दिलीप देशमुख, राजेश ठवकर, सुनील लांजेवार, फारुख सेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.