महिलांच्या सन्मानाची सुरुवात स्वतःच्या घरापासून करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:35 AM2021-03-10T04:35:19+5:302021-03-10T04:35:19+5:30
नरेश टिचकुले : पवनी येथे कर्तृत्ववान मातांचा सत्कार पवनी : स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी उक्तीप्रमाणे प्रत्येक मुलाला ...
नरेश टिचकुले : पवनी येथे कर्तृत्ववान मातांचा सत्कार
पवनी : स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी उक्तीप्रमाणे प्रत्येक मुलाला घडविण्यात आईचा फार मोठा वाटा असतो. अशा आईरूपी देवतांचा सन्मान होणे ही भाग्याची बाब आहे. महिलांच्या सन्मानाची सुरुवात स्वत:च्या घरापासून करावी, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी नरेश टीचकुले यांनी केले. येथील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान मातांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी तालुका गटसमन्वयक दीपाली बोरीकर, मच्छीमार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पचारे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित सत्कारमूर्ती प्रतिमा वाकडीकर यांनी अतिशय गरीब परिस्थितीत काबाडकष्ट करून आपल्या लेकीला न्यायाधीश बनविले. तसेच उज्ज्वला मेश्राम, हिराबाई पचारे, श्रीमती देशमुख तर शिवणकाम करून थोरल्या मुलीला डॉक्टर बनविले, तर धाकटा मुलाला एमबीबीएसचे शिक्षण देणाऱ्या रुषाली सावरबांधे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन सहायक शिक्षक केशर गणवीर यांनी, तर आभार मृणाली मोटघरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सहायक शिक्षिका वर्षा गणवीर, रिना सावरबांधे, दलाल, संदीप समर्थ, भुरे, रिता चव्हाण यांनी सहकार्य केले.