शाळांच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावर निर्बंध
By admin | Published: July 9, 2015 12:36 AM2015-07-09T00:36:35+5:302015-07-09T00:36:35+5:30
शालेय विद्यार्थ्यांमध्ये व तरुणांमध्ये तंबाखू सेवनाचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय बनला आहे.
शासनाचे निर्देश : धूम्रपान निषिद्ध क्षेत्राचा फलक लावणे गरजेचे
तुमसर : शालेय विद्यार्थ्यांमध्ये व तरुणांमध्ये तंबाखू सेवनाचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय बनला आहे. शालेय विद्यार्थी तंबाखूच्या व्यसनाच्या विळख्यात सापडू नयेत यासाठी प्रत्येक शैक्षणिक संस्थेत तंबाखू नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी होण्याकरिता राज्य शासनाने शाळांच्या व शैक्षणिक संस्थांच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावर तसेच शैक्षणिक संस्थांपासून १०० यार्डच्या आतमध्ये तंबाखूजन्य उत्पादनाची विक्री करण्यास बंदी तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांनीही शाळेच्या आवारात तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सोबतच धूम्रमान निषिद्धचा फलक लावणे आवश्यक असून नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
तंबाखूमुळे होणारे तरुणांचे मृत्यू ही टाळता येण्याजोगी गोष्ट आहे. भारतामध्ये दररोज अडीच हजार लोक तंबाखूशी संबंधित आजारामुळे मृत्यू पडतात. ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्वे (गॅट्स) च्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रामध्ये अडीच कोटी लोक तंबाखूचा वापर करतात. तंबाखूचा वाढता वापर आणि त्याच्या दुष्परिणामामुळे जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक समस्या म्हणून घोषित केले आहे. ग्लोबल यूथ तंबाखू सर्वेनुसार, भारतात १३ ते १५ वर्षे वयोगटातील १४ टक्केपो जास्त मुले तंबाखूचे सेवन करतात. लहान वयात तंबाखूची सवय लागल्याने ही सवय सोडणे कठीण जाते व यामुळे विविध असंसर्गजन्य आजार होण्याचा धोका असतो.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये व तरुणांमध्ये तंबाखू सेवनाचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. प्रत्येक वर्षी भारतामध्ये पाच हजार ५०० विद्यार्थी तंबाखू सेवनाला सुरुवात करतात आणि १५ वर्षे वयाखालील पाच लक्ष विद्यार्थी व्यसनाधीन बनतात. तंबाखू उत्पादक कंपन्यांतर्फे विद्यार्थ्यांना लक्ष केले जाते. भारतामध्ये आठ वर्षे वयापासून मुलांमध्ये तंबाखू सेवनाची सुरुवात होते. (तालुका प्रतिनिधी)
प्रभावीपणे नियंत्रण
केंद्र शासनाने तंबाखू वापरावर प्रभावीपणे नियंत्रण करण्यासाठी तयार केलेल्या तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायद्याचे कलम ६ नुसार शैक्षणिक संस्थापासून १०० यार्ड परिसरात तंबाखू विक्रीस बंदी, शाळेच्या प्रत्येक प्रवेशद्वाराच्या आत आणि प्रत्येक मजल्यावर बंदी घातली आहे.