भंडारा : निसर्गाचे दृष्टचक्र शेतकऱ्यांच्या पाठीमागे लागले असून, आता हाताशी आलेले धान परतीच्या पावसात उद्ध्वस्त होत आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांत कोसळणाऱ्या या पावसाचा फटका उभ्या धान पिकाला बसत आहे. अनेक शेतात पाणी साचले असून, कापलेल्या धानाचा कडपाही ओला होत आहे.
भंडारा जिल्ह्यात हलक्या प्रतीचे धान काढणीला आले असून, दिवाळी तोंडावर असल्याने शेतकरी धान काढणीची लगबग करीत आहे. मात्र, गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काढणीला ब्रेक लागला होता. त्यातच रविवारी आणि सोमवारी जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे शेतात उभा असलेले धान पीक ओले झाले, तर अनेक शेतात शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून कडपा बांधून ठेवल्या होत्या. पावसाचे पाणी साचल्याने धान कडपा ओल्या झाल्या आहेत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
हाता-तोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्ग हिरावून नेत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. सुरुवातीला पावसाने दगा दिला. त्यानंतर पाऊस बरसला. मात्र, त्याच काळात तुडतुड्यासह विविध किडींचे आक्रमण झाले. गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात धान काढणीचा हंगाम सुरू झाला होता. परंतु, आता ढगाळ वातावरण आणि काही भागात पाऊस बरसत असल्याने शेतकरी धास्तावला आहे. धान ओले झाल्यास धान पाखर होऊन बेचव होते. त्याला बाजारात कोणतीही किंमत येत नाही. निसर्गापुढे जिल्ह्यातील शेतकरी हतबल दिसत आहेत.
शेतकऱ्यांची चिंता वाढली
जिल्ह्यात यावर्षी एक लाख ९० हजार हेक्टरवर धानाची राेवणी झाली होती. यात सर्वाधिक धान हलक्या प्रतीचे म्हणजे कमी दिवसात काढणीला येणारे आहे. गत १५ दिवसांपासून हे धान पीक काढणीला आले आहे. अनेक शेतात कापणीचे काम सुरू आहे. परंतु, अशातच परतीचा पाऊस बरसत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अनेक शेतकरी धानाच्या कडपा एकत्र करून त्या ताडपत्रीने झाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसत आहे. पवनी, भंडारा, लाखनी, तुमसर, मोहाडी, साकोली तालुक्याला पावसाचा फटका बसत आहे.