वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता झाली त्रस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:25 AM2021-07-16T04:25:11+5:302021-07-16T04:25:11+5:30
पालांदूर : वाढत्या महागाईने सर्वसामान्य लोकांचे जगणे सध्या कठीण झाले आहे. रोजच्या मिळकतीत जीवन जगणे तारेवरची कसरत होत आहे. ...
पालांदूर : वाढत्या महागाईने सर्वसामान्य लोकांचे जगणे सध्या कठीण झाले आहे. रोजच्या मिळकतीत जीवन जगणे तारेवरची कसरत होत आहे. इंधन व गॅस दरवाढीने कुटुंबाचा आर्थिक बोजवारा उडाला आहे. शेतकरी वर्ग इंधन दरवाढीच्या चक्रात सापडला असून, रोवणीसह इतरही खर्चाची झालेली दरवाढ डोईजड होत आहे. सरकारने भरमसाठ कर लावत सामान्यांचे आर्थिक बजेट बिघडवले आहे. अमर्याद इंधन दरवाढ झाल्याने गोरगरीब भरडला जात आहे. जीवनावश्यक वस्तूंसह इतरही पूरक वस्तूंच्या किमती इंधन दरवाढीच्या कारणाने वाढल्या आहेत. सरकार गरिबांची आहे, का मोजक्याच धनिकांचे? असा प्रश्न चर्चेत आला आहे. राजकारणी कोणत्याही पक्षाचा असो. मात्र, इंधन दरवाढ सगळ्यांचे दुखणे झाले आहे. एवढी दरवाढ यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती. दोनशे रुपये मजुरी करणारा मजूर मात्र जगताना पावलोपावली शासनाला शाप देत आहे. डिझेल महागल्याने शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने होणाऱ्या कामांच्या दरातसुद्धा वाढ झाली आहे. ही दरवाढ सहन करावी लागत आहे. शेतकऱ्याला मिळालेले पीक कर्जसुद्धा महागाईच्या अमर्याद चक्राने खर्चाकरिता अपुरे पडत आहे. शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे शेतकऱ्याची पावलोपावली अडवणूक होत आहे.
कोट
सरकारने तेलाचे दर कमी करावेत. शेतीला ट्रॅक्टरशिवाय पर्याय नसल्याने इंधन दरवाढ परवडणारी नाही. रोजच्या खर्चात मोठी वाढ झाल्याने जगणे मुश्कील होत आहे. शेती उत्पादन खर्चात भरीव वाढ झाली आहे. ही शेतकऱ्यांना अजिबात परवडणारी नाही.
-कृष्णा पराते, शेतकरी पालांदूर