गत दोन - तीन वर्षांपासून माडगी देव्हाडी रस्त्याच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव धूळ खात पडून होता. मागील एक वर्षापूर्वी कंत्राटदाराने रस्ता बांधकामाचे साहित्य रस्त्याच्या कडेला ठेवले होते. आठ दिवसांपूर्वी सदर रस्त्याचे खडीकरण करून नूतनीकरण करण्यात आले.
रस्त्यावर बारीक काळी चुरी अंथरण्यात आली असून, या चुरीमुळे दुचाकी वाहन घसरून अपघात होत आहेत. रात्रीच्या सुमारास येथे अपघात घडले असून, रस्ता निमुळता आहे. त्यामुळे दुचाकीधारकांचा जीव येथे धोक्यात आला आहे.
रस्ता बांधकामानंतर रस्त्यावर बारीक काळी चुरी अंथरण्यात येत असल्याने गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येथील चुरी अपघाताला आमंत्रण देत आहे.
याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. या मार्गावर माडगी येथे कारखाना आहे. या कारखान्यात रात्रीच्या सुमारास जाणारे कामगार दुचाकीने जातात. या गावांना जोडणारा हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर वर्दळ आहे. रस्ता बांधकामाचे जनतेने स्वागत केले. परंतु अपघाताला आमंत्रण देणारी चुरी व्यवस्थित करण्याची गरज असतानाही दुर्लक्ष होत आहे. वाहनधारकांना त्रास होत आहे.