रेती वाहतुकीने रस्त्यांची चाळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 09:39 PM2018-11-11T21:39:18+5:302018-11-11T21:40:05+5:30
रेती वाहतुकीतील अवजड आणि ओव्हरलोड वाहनांमुळे बांधकाम विभागाच्या रस्त्याची पूर्ती वाट लागली आहे. रेतीघाटालगतच्या गावातील रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. याचा नाहक भुर्दंड बांधकाम विभागाला बसत असून महसूल आणि परिवहन विभाग मात्र अशा वाहन धारकांवर कोणतीही कारवाही करताना दिसत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : रेती वाहतुकीतील अवजड आणि ओव्हरलोड वाहनांमुळे बांधकाम विभागाच्या रस्त्याची पूर्ती वाट लागली आहे. रेतीघाटालगतच्या गावातील रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. याचा नाहक भुर्दंड बांधकाम विभागाला बसत असून महसूल आणि परिवहन विभाग मात्र अशा वाहन धारकांवर कोणतीही कारवाही करताना दिसत नाही.
भंडारा जिल्ह्यातून वैनगंगा नदीपात्रासह चुलबंद, सुर नदी, बावनथडी आणि नाल्यांमधून रेतीचे मोठ्या प्रमाणात खनन केले जात आहे. पवनी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागातून वाहणाऱ्या वैनगंगेच्या पात्रातून रेतीचे उत्खनन अहोरात्र सुरु आहे. जेसीबी मशीनद्वारे उत्खनन करुन ट्रक व ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली जाते. बहुतांश वाहने क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहून नेतात. राज्य व जिल्हा मार्गावरुन रेतीची वाहने धावत असल्याने रस्त्याची दुदर्शा झाली आहे. अनेक रेतीघाटालगतचे रस्ते या वाहनांमुळे उखडले आहेत. महसूल विभागाला यातून महसूल मिळत असला तरी त्याचा भुर्दंड मात्र बांधकाम विभागाला सोसावा लागत आहे.
रस्त्यांवर पडलेल्या या खड््यांमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. अनेकदा बांधकाम विभाग रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा प्रयत्न करतात. मात्र अहोरात्र सुरु असलेल्या या वाहतुकीने पुन्हा खड्डे जैसे थे होतात. याचा त्रास या मार्गावरुन जाणाºया वाहनधारकांसह गावकऱ्यांनाही सहन करावा लागतो. विशेष म्हणजे अवजड वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई करण्याचे अधिकार परिवहन विभागाला आहे. परंतू रेती वाहतुकीच्या संदर्भात कारवाई करताना केवळ पोलीस व महसूल विभागच दिसतो. परिवहन विभाग अशा वाहनांवर कारवाई करीत नाही. त्यांना दंड आकारत नाही. त्यामुळे अशा वाहन चालकांचे मनोबल वाढले आहे. यंदा तर अद्यापही जिल्ह्यातील रेतीघाटांचे लिलाव झाले नाही. त्यामुळे महसुल विभागालाही महसुल प्राप्त नाही. परंतु रस्त्याची दुदर्शा मात्र होत आहे.
रेतीचा परवाना काढताना त्यावरच किती ब्रास रेती वाहुन न्यायची आहे, हे ठरलेली असते. परंतु अधिक पैसे कमविण्याच्या नादात रेती तस्कर रस्त्यांची वाट लावत आहेत.