पवनी येथे साकारतेय कोरोना मृतांसाठी स्मशानभूमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:32 AM2021-04-19T04:32:24+5:302021-04-19T04:32:24+5:30
पवनी येथील खापरी रोडवरील विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांनी धरणाच्या कालव्याकरिता अधिग्रहित केलेल्या व सध्या खाली असलेल्या गट नं ...
पवनी येथील खापरी रोडवरील विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांनी धरणाच्या कालव्याकरिता अधिग्रहित केलेल्या व सध्या खाली असलेल्या गट नं १३९ मध्ये जिल्हाधिकारी भंडारा यांच्या आदेशानुसार कोरोनाने मरण पावलेल्या रुग्णाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीचे काम अंतिम टप्यात सुरू आहे. येत्या दोन, तीन दिवसात कोरोना स्मशानभूमीचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती तहसीलदार नीलिमा रंगारी यांनी दिली. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूच्या संख्येत लाक्षणिक वाढ होत असून कोरोना रुग्णांचे दहन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्मशानभूमीत जागा व वेळही अपुरा पडत असून अनेक मृतदेह अंत्यसंस्काराकरिता प्रतीक्षेत राहत आहेत. नातेवाईक अंत्यसंस्काराकरिता वाट पाहत असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील कोविडमुळे मरण पावलेल्या रुग्णांच्या मृतदेहाची हेडसांड होऊ नये म्हणून पवनी येथे कोविड स्मशानभूमी साकारत असून कोविड आटोक्यात येताच येथील स्मशानभूमी हटविण्यात येईल, असेही तहसीलदार पवनी यांनी सांगितले.
परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
पवनी येथे कोविमुळे मृत पावलेल्या रुग्णांना जाळण्याकरिता तयार होत असलेल्या स्मशानभूमीला परिसरातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असून स्मशानभूमी तयार करण्याच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. अशा शेतकऱ्यांना पोलिसांकडून समज देऊन सोडण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार नीलिमा रंगारी, खंडविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, सहा. पोलीस निरीक्षक पी. के भैसाने, मुख्याधिकारी रवींद्र झाले, आरिफ शेख, मंडळ अधिकारी कावटे उपस्थित होते.