व्यसनी माणसाला जडलेले व्यसन हे त्याच्या आयुष्याचा विनाश केल्याशिवाय राहात नाही, असे कधी काळी म्हटले आहे. त्यानुसारच एकदा व्यसनाधीन व्यक्ती झाली की त्याला कशाचेच भान राहत नाही. अशीच परिस्थिती सध्या साकोली येथील जुन्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसराची झाली आहे. हा परिसर तळीराम व गंजेटी या नावानेच प्रसिद्ध होत आहे. दीड वर्षापासून कोरोना महामारीने संपूर्ण जगाला वेढलेले असल्यामुळे दीड वर्षापासून राज्यात काय तर देशातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे जिल्हा परिषद शाळेचा परिसरात सायंकाळ होताच शुकशुकाट असतो. याचाच नेमका फायदा घेत गांजा ओढणारे व दारुड्यांनी या परिसराचा फायदा घेतल्यामुळे रात्री मद्यपींचा ताब्यात हा परिसर असतो. या शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर कधी कुलूप दिसते, तर कधी प्रवेशद्वार उघडे दिसते. त्यामुळे नेमका शाळेतला कोणता कर्मचारी किंवा शिक्षक त्यांच्या ताब्यात ही शाळा आहे हे समजण्यापलीकडे असून, शाळेचे प्रवेशद्वार कोण उघडतो आणि कोण बंद करतो हा चर्चेचा विषय आहे.
तालुक्याच्या एकही प्राथमिक जिल्हा परिषद शाळेमध्ये शिपायाचे पद नसतानाही अशा परिसरात साफसफाई स्वच्छता राखण्याची जबाबदारी कोणाची आहे. याबाबतही शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. या शाळेच्या परिसरात दारुड्या व गांजाच्या झुरका मारणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून, अनेकवेळा शाळा परिसरात सिगरेटचे थोट व दारूच्या रिकाम्या बाटल्या पहायला मिळतात. परंतु या शाळेतील शिक्षक याबाबत कुठेही वाच्यता करताना दिसत नाही. जिल्हा परिषद शाळा ही फार जुनी असून, शिक्षणासारख्या पवित्र परिसरात दारुडे व गांजा ओढणारे यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पोलीस प्रशासन यांनी अशांवर कारवाई करून वेळेतच युवापिढीला व्यसनापासून दूर ठेवण्याचे काम करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.